अ‍ॅपशहर

पाकच्या भ्याड हल्ल्यात तीन जवानांना वीरमरण

जम्मू-काश्मीरमधील माछिल क्षेत्रात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आलं आहे. या शहीद जवानांपैकी एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना करून पाकनं आपली हीन वृत्ती पुन्हा दाखवून दिली आहे.

Maharashtra Times 22 Nov 2016, 6:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जम्मू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 soldiers killed in pakistani action on loc in machhal
पाकच्या भ्याड हल्ल्यात तीन जवानांना वीरमरण


जम्मू-काश्मीरमधील माछिल क्षेत्रात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आलं आहे. या शहीद जवानांपैकी एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना करून पाकनं आपली हीन वृत्ती पुन्हा दाखवून दिली आहे.

पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश संरक्षण खात्याकडून लष्कराला देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ऑक्टोबर महिन्यातही नियंत्रण रेषेजवळील माछिलमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला होता. त्यात एका जवानाला हौतात्म्य आलं होतं आणि त्याच्या मृतदेहाची विटंबना करून दहशतवादी पळून गेले होते. त्यानंतर परराष्ट्र खात्यानं पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्स बजावलं होतं. आताही, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आक्रमक पवित्रा घेत, पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचे आदेश लष्कराला दिले आहेत.

भारतीय लष्करानं केलेल्या गोळीबारात आपले सात सैनिक ठार झाल्याचा दावा पाकिस्ताननं गेल्या आठवड्यात केला होता. त्याचा बदला घेण्याची धमकीही त्यांनी दिली होती. त्यातच, पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ हे २९ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांनीही नुकतीच सैनिकांसोबत बैठक घेतली होती. त्यानंतरच ही घटना घडली आहे.

दरम्यान, उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्करानं केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'नंतर पाक सैरभैर झाला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी शंभरहून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करून आपली धुसफूस दाखवून दिली होती. त्यालाही भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं आणि पाकला पांढरं निशाण फडकवावं लागलं होतं. आता, पाकच्या या हल्ल्यानंतर सीमेवर पुन्हा तणावाचं वातावरण आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज