अ‍ॅपशहर

अखिलेश बाइकवर बसणार; नवा पक्ष काढणार?

समाजवादी पार्टीतील भाऊबंदकीमुळे उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. शिवपाल व अखिलेश या चुलत्या-पुतण्यांच्या वादामुळे पक्षात फूट पडणार असल्याची चर्चा आहे. अखिलेश यांनी राष्ट्रीय समाजवादी पार्टी किंवा प्रगतीशील समाजवादी पार्टी नावाने नव्या पक्षाची स्थापना करण्याचा विचार केला असून मोटारसायकल हे पक्षाचे निवडणूक चिन्ह असेल, अशी चर्चा आहे.

Maharashtra Times 24 Oct 2016, 9:01 am
वृत्तसंस्था, लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम akhilesh yadav to form new political party
अखिलेश बाइकवर बसणार; नवा पक्ष काढणार?


समाजवादी पार्टीतील भाऊबंदकीमुळे उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. शिवपाल व अखिलेश या चुलत्या-पुतण्यांच्या वादामुळे पक्षात फूट पडणार असल्याची चर्चा आहे. अखिलेश यांनी राष्ट्रीय समाजवादी पार्टी किंवा प्रगतीशील समाजवादी पार्टी नावाने नव्या पक्षाची स्थापना करण्याचा विचार केला असून मोटारसायकल हे पक्षाचे निवडणूक चिन्ह असेल, अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रविवारी जमलेले कार्यकर्ते वेळ पडल्यास वेगळ्या पक्षाच्या तयारीत दिसत होते. दोन महिन्यांपूर्वी अमर सिंह यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतरही पक्षात असाच गदारोळ माजला होता. त्याहीवेळी अखिलेश यांनी शिवपाल यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवून मुलायम यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले होते.

अमर सिंह यांच्या समर्थकांविरोधात अखिलेश यांनी उचललेल्या या कडक पावलांमुळे मुलायम यांच्या गोटात खळबळ उडाली असून पुढील कारवाईची दिशा ठरवण्यासाठी समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. मुलायम यांनी पक्षाचे मंत्री, खासदार आणि आमदारांची तातडीने बैठक बोलावली असून लवकरच काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. ५ नोव्हेंबरला समाजवादी पार्टी आपला रौप्य महोत्सवाची तयारी करत असताना अखिलेश मात्र ३ नोव्हेंबरलाच रथयात्रेसाठी बाहेर पडणार आहेत. तसे पत्रही त्यांनी मुलायम यांना यापूर्वीच पाठवले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांनी अखिलेश यांनी राजीनामा द्यावा किंवा विधिमंडळात बहुमत सिद्ध करावे, असे आव्हान दिले आहे. अल्पमतात आलेले सरकार कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

जिथे अखिलेश, तिथे विजय!

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अखिलेश यांच्या मागे उभे असलेले मुलायम यांचे चुलतभाऊ रामगोपाल यादव यांनी मुलायम यांना पत्र लिहिले आहे. अखिलेश यांना विरोध करणारे पुन्हा विधानसभेचे तोंड बघू शकणार नाहीत. जिथे अखिलेश, तिथे विजय नक्की आहे कारण तोच सच्चा आणि लोकप्रिय नेता आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

बाहेरच्या माणसामुळेच वाद

‘या सगळ्या दुर्दैवी घटनांना बाहेरून आलेली एक व्यक्ती जबाबदार आहे,’ अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते आझम खान यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची कारवाई उशिरा होत असली तरी ती अपरिहार्य होती, असे ते म्हणाले..

हकालपट्टीची चिंता नाही

मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा निर्णय हा पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न असून, आपल्याला काढून टाकण्याबाबत अजिबात चिंता नाही, असे शिवपाल यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुका मुलायम यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. अखिलेश यांनी माणसे ओळखायला शिकावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज