अ‍ॅपशहर

माफी मागतो; पण भूमिकेवर ठाम, इस्रायली चित्रपट निर्माते लॅपिड यांचा पावित्रा

'मला कुणाला अपमानित करायचे नव्हते. ज्यांनी यातना भोगल्या त्यांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना अपमानित करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो', असे लॅपिड म्हणाले.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 2 Dec 2022, 8:06 am
नवी दिल्ली : 'काश्मिरी पंडित किंवा ज्यांनी यातना भोगल्या, त्यांना अपमानित करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. आपल्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात आला', असे स्पष्टीकरण देत; इफ्फीच्या समारोपावेळी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावर टीका करणारे इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली. मात्र, त्याचवेळी आपण या चित्रपटाच्या महोत्सवातील समावेशाबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम navad lapid
माफी मागतो; पण भूमिकेवर ठाम, इस्रायली चित्रपट निर्माते लॅपिड यांचा पावित्रा


गोव्यात पार पडलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) प्रमुख परीक्षक (ज्युरी) असलेल्या लॅपिड यांनी विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा 'अपप्रचार करणार चित्रपट' असल्याची टीका केली होती. यावरून देशात नव्या वादाला तोंड फुटले होते. इस्रायलचे मध्य-पश्चिम भारतातील कौन्सुल जनरल कोबी शोशानी यांच्यावर याबाबत स्पष्टीकरण देण्याची वेळी आली होती. लॅपिड यांनी या चित्रपटावर केलेल्या टिप्पणीशी इस्रायलचा संबंध नसल्याचे शोशानी यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले होते. या सर्व घडामोडींनंतर लॅपिड यांनी बुधवारी रात्री एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.

'मला कुणाला अपमानित करायचे नव्हते. ज्यांनी यातना भोगल्या त्यांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना अपमानित करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो', असे लॅपिड म्हणाले. 'पण त्याचवेळी, मी जे काही बोललो त्यावर मी ठाम आहे. हा एक अपप्रचार करणारा चित्रपट असून, त्याला अशा चित्रपट महोत्सवात स्थान देणे योग्य नाही किंवा प्रतिष्ठित स्पर्धात्मक विभागासाठी तो अयोग्य आहे, असे मी माझ्या सहकारी ज्युरी सदस्यांना म्हटले होते. मी पुन्हा पुन्हा हेच बोलेन', अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

'माझी टिप्पणी चित्रपटाबाबत'

'या शोकांतिकेतील पीडितांबद्दल मला खूप आदर आहे. किंबहुना माझी टिप्पणी त्यांच्याबद्दल नव्हे, तर चित्रपटाबाबत होती. मी राजकीय मुद्दा, ऐतिहासिक समीकरण किंवा काश्मीरमध्ये घडलेल्या शोकांतिकेचा अनादर करण्याबद्दल बोलत नसेन, तर मी माझ्या वक्तव्याचा १० हजार वेळा पुनरुच्चार करेन', असे लॅपिड यावेळी म्हणाले.

महत्वाचे लेख