अ‍ॅपशहर

स्वरवैभवाने सजणार ‘मेणाचे घर’

गायकीतील प्रत्येक प्रकार नजाकतीने सादर करणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे स्वरवैभव आता मेणाच्या घरात जपले जाणार आहे. लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियमचाच भाग असलेल्या दिल्लीतील याच म्युझियममध्ये आशाताईंचा मेणाचा पुतळा विराजमान होणार आहे.

Maharashtra Times 14 Jun 2017, 4:44 am
दिल्लीतील ‘मादाम तुसाँ’मध्ये आशा भोसले यांचा पुतळा बसवणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम asha bhosle to be immortalised in wax for delhis madame tussauds
स्वरवैभवाने सजणार ‘मेणाचे घर’


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गायकीतील प्रत्येक प्रकार नजाकतीने सादर करणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे स्वरवैभव आता मेणाच्या घरात जपले जाणार आहे. लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियमचाच भाग असलेल्या दिल्लीतील याच म्युझियममध्ये आशाताईंचा मेणाचा पुतळा विराजमान होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीत प्रकारातील दिग्गजांच्या रांगेत आता आशाताईंनाही स्थान मिळाले आहे.

मराठी, हिंदी, बंगाली, आसामी, इंग्रजी अशा अनेक भाषक रसिकांवर तब्बल सहा दशके आशाताईंनी गारूड घातले आहे. एक हजाराहून अधिक चित्रपटांना सूरांचा साज चढवलेल्या व देशी-परदेशी अशा २० भाषांतील गीतांना श्रवणीय बनवलेल्या आशाताईंचा आता हा नवा गौरव होणार आहे. त्यांच्या गायकीतील याच प्रतिभेची व योगदानाची दखल घेत ‘मादाम तुसाँ’ने आपल्या म्युझियममध्ये आशाताईंचाही मेणाचा पुतळा स्थानापन्न करण्याचा निर्णय घेतला. आशाताईंची मेणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांच्या गायकीची खास लकब, चेहऱ्यावरील हसरे भाव, गालावरील खळी, हात हलवण्याची खास शैली या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी म्युझियमतर्फे बारकाव्यांसाठी १५०हून अधिक मापे घेण्यात आली. यावेळी आशाताई त्यांच्या सर्वाधिक आवडीच्या व प्रसन्न पेहरावात होत्या. मोती रंगाची नक्षीदार साडी, कानात मोत्याची कुडी, गळ्यात मोत्याचा सर, मनगटावर मोत्याचे ब्रेसलेट आणि चेहऱ्यावर होते नेहमीचेच नितळ हास्य!

दिल्लीच्या या म्युझियममध्ये क्रीडा, सिनेमा, राजकारण, इतिहास आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे ५०हून अधिक मेणाचे पुतळे बसवण्यात येणार आहेत. संगीत क्षेत्रातील कक्षात आशाताईंचा सुहास्य पुतळा विराजमान होईल. ‘आशाताईंना अनेक पिढ्यांचे प्रेम आणि जिव्हाळा लाभला. संगीत व गायन क्षेत्रातील त्या अढळ स्थान आहेत’, अशा शब्दांत ‘मादाम तुसाँ’ म्युझियमच्या मर्लिन एंटरटेन्मेंट्स या कंपनीच्या संचालक अन्शुल जैन यांनी या निर्णयाची माहिती दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज