अ‍ॅपशहर

सहा दिवसांपूर्वी दुसरं लग्न, २६ वर्षीय गे पार्टनरकडून हत्या, बिझनेसमनच्या खुनाचं गूढ उकललं

Bangalore Crime : बांधकाम कामगार इलियाजची तीन वर्षांपूर्वी एका जिममध्ये लियाकतशी ओळख झाली. मैत्री झाल्यानंतर एका वर्षात दोघं रिलेशनशीपमध्ये अडकले. मात्र दुसरं लग्न केल्यानंतरही गे पार्टनरसोबत त्याला संबंध कायम ठेवायचे होते

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2023, 3:15 pm
बंगळुरु : म्हैसूर रोडजवळील नयंदहल्ली येथील एका जुन्या इमारतीत २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या ४४ वर्षीय व्यावसायिकाच्या खुनाचे रहस्य उलगडले आहे. त्याच्या २६ वर्षीय समलैंगिक जोडीदारानेच ही हत्या केल्याचा आरोप आहे. रिलेशनशीप तोडण्याची आरोपीची मागणी ऐकत नसल्याने अखेर त्याने बिझनेसमनचा काटा काढला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Liyakath Ali Khan
मयत लियाकत खान


लियाकत अली खान असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. त्याचा २६ वर्षीय गे पार्टनर इलियाज खान याने डोक्यावर हातोड्याने, तर शरीरावर कात्रीने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

लियाकत अली खान जाहिरात छपाई एजन्सी चालवत होता. त्याने २२ फेब्रुवारी रोजी दुसरे लग्न केले होते. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. त्यांच्यासोबत तो चंद्रा लेआउटमध्ये राहत होता. २८ फेब्रुवारीला वडील बराच वेळ घरी न आल्याने १७ वर्षीय मुलाने त्यांची शोधाशोध सुरु केली. पहाटे दोन वाजताच्या सुमारास मुलाला लियाकत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचं आढळलं.

लियाकतचा २६ वर्षीय गे पार्टनर इलियाज खानसह तिघा जणांवर मुलाने संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. या हत्येमागे आर्थिक वादाचा संशय मुलाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेजे नगर येथील बांधकाम कामगार इलियाजची तीन वर्षांपूर्वी एका जिममध्ये लियाकतशी ओळख झाली. मैत्री झाल्यानंतर एका वर्षात दोघं रिलेशनशीपमध्ये अडकले.

पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी दोघे लियाकतच्या जुन्या इमारतीत भेटले होते. सेक्स केल्यानंतर ब्रेकअपच्या विषयावरून त्यांच्यात भांडण झाले. इलियाजला त्याच्या पालकांनी ठरवून दिलेल्या मुलीसोबत लग्न करायचे होते आणि लियाकतसोबतचे नाते संपवायचे होते. परंतु लियाकतने संबंध तोडण्यास नकार दिला. इलियाजने लग्नानंतरही संबंध ठेवण्याची गळ घातली.

खरं तर, अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. लियाकत त्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने संतप्त झालेल्या इलियाजने त्याची हत्या केली. रात्री अकरा वाजताच्या सुमारास तो घरी परतला आणि त्याने झोपेच्या काही गोळ्या घेतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या वडिलांनी त्याला तळमळताना पाहून तातडीने रुग्णालयात नेले. आपल्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची पोलिस तक्रार त्यांनी दाखल केली.

डीसीपी (पश्चिम) लक्ष्मण निंबर्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला सोमवारी रुग्णालयातून सोडण्यात आले आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख