अ‍ॅपशहर

भाजपच्या संसदीय समितीतून महाराष्ट्र हद्दपार; गडकरी आऊट, फडणवीसांना स्थान नाही

bjp new parliamentary board announced: भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता या समितीमध्ये महाराष्ट्रातील एकही नेता नाही.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Aug 2022, 3:46 pm
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या नव्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता या समितीमध्ये महाराष्ट्रातील एकही नेता नाही. या समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र त्यांच्या नावाचा समावेश या समितीत करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gadkari and devendra
देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं संसदीय समितीची घोषणा केली आहे. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना स्थान देण्यात आलेलं नाही. हे दोन्ही वरिष्ठ नेते आधी या समितीमध्ये होते. मात्र आता त्यांची नावं वगळण्यात आली आहेत. त्यांच्या जागी आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या नेत्यांसोबत सुधा यादव, के. लक्ष्मण, सत्यनारायण जटिया आणि इक्बाल सिंह लालपुरा या नेत्यांना समितीत स्थान देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे समितीत कायम आहेत.

नव्या संसदीय समितीसोबतच भाजपनं केंद्रीय निवडणूक समितीचीदेखील घोषणा केली आहे. या समितीत एकूण १५ जण आहेत. या समितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांना या समितीत स्थान देण्यात आलेलं आहे. भाजपच्या निवडणूक समितीला तिकीट वाटपाचे अधिकार असतात. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीनं ही समिती महत्त्वाची मानली जाते.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख