अ‍ॅपशहर

काळवीटाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने!

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानने आज जोधपूर कोर्टात हजर राहून आपला जबाब आज नोंदवला. आपल्या जबाबात काळवीटाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचा दावा त्याने केला.

Maharashtra Times 27 Jan 2017, 3:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जोधपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम blackbuck died of natural causes salman claims in jodhpur court
काळवीटाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने!


१९९८ मध्ये झालेल्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानने आज जोधपूर न्यायालयात हजर राहून आपला जबाब नोंदवला. यावेळी काळवीटाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचा दावा त्याने केला. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

जोधपूर न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी दलपतसिंग राजपुरोहित यांनी सलमानला ६० प्रश्न विचारले. यातील बहुतेक प्रश्न चुकीचे असल्याचे सांगत सलमानने उत्तर नाकारले तसेच पहिल्या फॉरेन्सिक रिपोर्टचा उल्लेख करत काळवीटाच्या शिकारीचा आरोप फेटाळला. सलमान म्हणाला, 'डॉ. नेपालिया यांनी काळवीटाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे नमूद केले आहे आणि तेच योग्य आहे.'

काळवीटावर गोळी झाडताना तुला दोन लोकांनी पाहिले आहे, हे खरे आहे का?, असा प्रश्न न्यायदंडाधिकाऱ्यांनी विचारला असता 'गलत' असं एका शब्दात सलमानने उत्तर दिलं. सलमानला शस्त्रपरवाना नसतानाही बंदूक वापरल्याबाबतही काही प्रश्न विचारण्यात आले मात्र हे सर्व प्रश्न सलमानने टोलवले. जीपवर काळवीटाच्या रक्ताचे डाग व केस आढळल्याबाबत विचारले असता यात काहीही तथ्य नसल्याचं सलमानने सांगितलं. तू रात्रीच्यावेळी शिकारीला गेला होता का?, अशी विचारणा केली असता 'नाही' असं उत्तर त्याने दिलं.


Blackbuck poaching case: Salman Khan, Saif Ali Khan, Tabu and Sonali Bendre appear before Jodhpur court. pic.twitter.com/NFf01QRIFl — ANI (@ANI_news) January 27, 2017
सलमान आपल्या वकिलांसोबतच कोर्टात उभा होता. जवळपास अर्धा तास त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. त्याचा जबाब संपल्यानंतर सैफ अली खानचा जबाब नोंदवून घेण्यात आला. तब्बू, सोनाली बेंद्रेही कोर्टात हजर होत्या.

दरम्यान, काळवीट शिकार प्रकरणातील अन्य एका खटल्यातून १८ जानेवारी रोजी जोधपूर कोर्टाने सलमानची निर्दोष मुक्तता केलेली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज