अ‍ॅपशहर

CAA विरोधात कर्नाटक, उत्तर प्रदेशात हिंसक आंदोलन, तीन ठार

कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या आंदोलनात आज तीनजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कर्नाटकातील मंगळूरमधील दोघांचा आणि उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एका तरुणाचा समावेश आहे. तर गुजरातमध्ये आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने १९ पोलिस जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2019, 10:53 pm
मंगळूर: कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या आंदोलनात आज तीनजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कर्नाटकातील मंगळूरमधील दोघांचा आणि उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एका तरुणाचा समावेश आहे. तर गुजरातमध्ये आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने १९ पोलिस जखमी झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम protest


कर्नाटकच्या मंगळूरमध्ये आजही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन झालं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळूरमधील सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आंदोलकांनी आज सकाळपासूनच ठिकठिकाणी जाळपोळ करत निषेध नोंदवला. काही आंदोलकांनी तर पोलिस ठाण्यावरच हल्लाबोल करत पोलिस ठाण्याला आगीच्या हवाली केलं. त्यामुळे संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी आदी लाठीमार केला. मात्र लाठीमारानंतरही आंदोलक अधिक आक्रमक झाल्याने पोलिसांनी थेट जमावाच्या दिशेनेच गोळीबार केला. त्यात जलील (वय ४९) आणि नौसीन (वय २३) या दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या गोळीबारानंतरही आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला सुरूच ठेवला. गोळीबारानंतर आंदोलकांमध्ये धावपळही उडाली. त्यात अनेकजण जखमी झाल्याचं सांगण्यात येतं.

तर उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आज सलग चौथ्या दिवशी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. लखनऊच्या हुसैनाबाद येथे जमावाने जाळपोळ करत प्रचंड निदर्शने केली. या जमावाने काही ठिकाणी रास्तारोकोही केला. या दरम्यान पोलिसांनी गोळीबार केल्याने त्यात मोहम्मद वकील नावाच्या तरुण गंभीर जखमी झाला. त्याला लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या तरुणाचा मृत्यू गोळी लागून झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. हा तरुण सज्जाद बाग येथे राहतो. आंदोलकांनी आधी मीडियाच्या गाडीला आग लावली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, असं पोलिसांनी सांगितलं. सीसीटीव्हीचे फुटेज पाहून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.


CAA: लखनऊमध्ये दोन पोलीस चौक्या जाळल्या

गाझियाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद

लखनऊ आणि उत्तर प्रदेशच्या इतर भागात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गाझियाबाद येथेही २४ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत गाझियाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील अनेक संवेदनशील ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

मुंबईसह नागपूर, मालेगावमध्ये आंदोलन तीव्र


जमावाचा पोलिसांवर हल्ला

गुजरातच्या अहमदाबाद येथे आज हिंसक जमावाने पोलिसांवरच हल्लाबोल केला. अहमदाबाद येथे एका चौकात प्रचंड संख्येने आलेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र हा जमाव पांगण्याऐवजी अधिक आक्रमक झाला असून त्याने पोलिसांवरच हल्ला केला. अचानक आक्रमक झालेल्या जमावाने अक्षरश: पोलिसांचा पाठलाग करत करत त्यांच्यावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमावाच्या तुलनेत पोलिसांची संख्या तुरळक होती. त्यामुळे हे पोलिस जमावापासून वाचण्यासाठी एका दुकानाच्या आश्रयाला गेले. मात्र तिथेही घुसून या जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात १९ पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांवर जमावाकडून होत असलेल्या हल्ल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत ३२ जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याचं अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांनी सांगितलं.


CAA: लेखक रामचंद्र गुहा पोलिसांच्या ताब्यात

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज