अ‍ॅपशहर

खोटं बोलणाऱ्या भाजपला धडा शिकवा: प्रियांका गांधी- वद्रा

​​विभाजनवादी आणि नकारात्मकतेच्या राजकारणाचा अंत करा आणि या निवडणुकीत भाजपला धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वद्रा यांनी बुधवारी केले.

महाराष्ट्र टाइम्स 25 Apr 2019, 5:52 am
फतेहपूर (उत्तर प्रदेश) ;
महाराष्ट्र टाइम्स.कॉम priyanka-gandhi


विभाजनवादी आणि नकारात्मकतेच्या राजकारणाचा अंत करा आणि या निवडणुकीत भाजपला धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वद्रा यांनी बुधवारी केले.

प्रियांका वद्रा या पूर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी असून, त्यांनी फतेहपूरमध्ये प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, 'विभाजनवादी आणि नकारात्मक राजकारणाचा अंत करून, थेट तुमच्याविषयी, तुमच्या समस्यांविषयी बोलणाऱ्या राजकारणाला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. लोकशाहीमध्ये जनतेच्या ताकदीपेक्षा अन्य कोणीही मोठे असू शकत नाही. त्यामुळे खोटे बोलणाऱ्या आणि तुमचे कोणतेही काम न करणाऱ्या नेत्यांना मत देऊ नका. भाजपचे राजकारण तळागाळातील जनतेचे राजकारण नाही. त्यांचा सामान्य नागरिकांशी काहीही संबंध नाही आणि ते केवळ हवेतील गप्पा मारतात. त्यांना तुम्ही धडा शिकवा.' लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न असून, सरकारविरोधात बोलणाऱ्यांची दडपशाही सुरू आहे, असे सांगताना प्रियांका यांनी एका महिलेचे उदाहरण दिले. त्याविषयी त्या म्हणाल्या, 'वेतन न मिळालेल्या एका शिक्षिकेची माझी भेट झाली. वेतनासाठी तिने आंदोलन केले असता, तिला मारहाण करण्यात आली आणि तुरुंगात पाठविण्यात आले. तिच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वेतन मागणाऱ्या महिलेवर एवढ्या गंभीर गुन्ह्याची नोंद होते, ही गोष्ट विचारात घ्या. वाराणसीमध्ये एक तरुण भेटला, त्यालाही आंदोलन केल्यामुळे मारहाण करण्यात आली. ही लोकशाही आहे का?'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम माझ्या कुटुंबाविषयी बोलत असतात. त्यांच्या ४५ टक्के भाषणांमध्ये नेहरूंनी काय केले, इंदिरा गांधी यांनी काय केले, असेच प्रश्न होते. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये काय केले, हे मोदी काहीच सांगत नाही,' यावरही त्यांनी बोट ठेवले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज