अ‍ॅपशहर

लाचखोरांची नावे सांगा

‘केंद्रातील मोदी सरकारमध्ये दम असेल, तर ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोन महिन्यांच्या आत लाच घेणाऱ्यांची नावे जाहीर करावी,’ असे आव्हान शुक्रवारी काँग्रेसने दिले.

Maharashtra Times 30 Apr 2016, 12:46 am
काँग्रेस पक्षाने दिले मोदी सरकारला आव्हान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress slams bjp
लाचखोरांची नावे सांगा


म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

‘केंद्रातील मोदी सरकारमध्ये दम असेल, तर ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोन महिन्यांच्या आत लाच घेणाऱ्यांची नावे जाहीर करावी,’ असे आव्हान शुक्रवारी काँग्रेसने दिले.

‘मोदी सरकारला देशाप्रती खरोखरीच प्रामाणिकपणा दाखवायचा असेल, तर सीबीआय, रॉ, सक्तवसुली संचालनालय आणि संपूर्ण सरकारी यंत्रणेचा वापर करून संसदेच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत घोटाळेबाजांची नावे उघड करावी,’ अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी केली. दरम्यान, ऑगस्टा वेस्टलँडशी संबंधित कोणताही सौदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हेलिकॉप्टर खरेदी सौद्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनियांचे राजकीय सचिव अहमद पटेल; तसेच ऑस्कर फर्नांडिस या काँग्रेस नेत्यांनी लाच घेतल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. ‘भाजपने हा आरोपांचा तमाशा बंद करावा आणि या घोटाळ्याची चौकशी करून लाचखोरांची नावे उघड करावी,’ अशी मागणी आझाद यांनी केली. ‘हेलिकॉप्टर सौद्यात काँग्रेसच्या नेत्यांनी लाच घेतली असती, तर खरेदीचा करार रद्द करून या प्रकरणाची आम्ही सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडे चौकशी सोपविली नसती; तसेच ऑगस्टा वेस्टलँड आणि फिनमेक्कानिका कंपनीला काळ्या यादीत टाकले नसते,’ असा दावा आझाद यांनी केला. त्यांनी काँग्रेसवरील सर्व आरोप फेटाळून लावत, ‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या मुद्द्यावर प्रश्न न विचारलेलेच बरे राहील,’ असे मतही व्यक्त केले.

आरोप-प्रत्यारोप सुरूच

‘संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालू द्यायचे असेल, तर हेलिकॉप्टर सौद्यावर सभागृहात भाष्य करायचे नाही,’ अशी तडजोड काँग्रेस आणि भाजपमध्ये झाली आहे. मात्र, संसदेबाहेर दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. शुक्रवारी अमित शहा; तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रवीशंकर प्रसाद यांनी पुन्हा सोनिया गांधींवर हल्ला चढवला, तर काँग्रेसच्या वतीने सोनियांना लक्ष्य करणारे सुब्रमण्यम स्वामी

यांच्या निवासस्थानापुढे; तसेच भाजपच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारने ऑगस्टा वेस्टलँडला काळ्या यादीतून काढल्याचा आरोप ज्योतिरादित्य शिंदे आणि गुलाम नबी आझाद यांनी केला.

त्यागींना ‘ईडी’चे समन्स

हेलिकॉप्टर सौद्यामध्ये लाच घेतल्याचा आरोप असलेले भारताचे तत्कालीन हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांना सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले आहे. नेमकी तारीख जाहीर केलेली नसली, तरी त्यागी यांना पुढील आठवड्यामध्ये व्यक्तिशः हजर राहण्यास बजावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. निवृत्त हवाई दलप्रमुखांना समन्स बजावले जाण्याची ह‌ी पहिलीच वेळ आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज