अ‍ॅपशहर

karnataka: हा संविधानाचा विजय: काँग्रेस

सर्वोच्च न्यायालयाने भाजपला उद्या शनिवारी कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगून दणका दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने आनंद व्यक्त करतानाच हा संविधानाचा विजय असल्याचं म्हटलं आहे. तर उद्या आम्ही बहुमत सिद्ध करू, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2018, 1:55 pm
नवी दिल्ली:

सर्वोच्च न्यायालयाने भाजपला उद्या शनिवारी कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगून दणका दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने आनंद व्यक्त करतानाच हा संविधानाचा विजय असल्याचं म्हटलं आहे. तर उद्या आम्ही बहुमत सिद्ध करू, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केला आहे.

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी असंविधानिक निर्णय घेतला होता, या आमच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनं शिक्कामोर्तब केलं आहे, असं ट्विट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे.

पुरेसं संख्याबळ नसताना सरकार स्थापन करण्याचा भाजपचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला आहे. कायदेशीर बाबीत भाजप मागे पडला आहे. आता भाजप साम, दाम, दंड, भेदाचा अवलंब करून बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील, अशी टीकाही राहुल यांनी केली आहे.


काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली. हा संविधानाचा विजय असून लोकशाही अबाधित आहे, असं ट्विट सुरजेवाला यांनी केलं आहे. येडियुरप्पा केवळ एक दिवसाचे मुख्यमंत्री ठरणार आहेत. संविधानाने एका अवैधानिक मुख्यमंत्र्याला नाकारले आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या राज्यपालांच्या असंविधानिक निर्णयालाही संविधानाने नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे.


तर आम्ही मुख्य सचिवांशी चर्चा केली असून त्यांना उद्याच अधिवेशन घेण्यास सांगितलं आहे. उद्या आम्ही बहुमत सिद्ध करू याचा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे, असं येडियुरप्पा यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही बहुमत सिद्ध करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज