अ‍ॅपशहर

coronavirus : भारतात करोना संसर्गाची चौथी लाट येण्याची भीती? ICMR चे तज्ज्ञ म्हणाले...

भारतात करोनाचा संसर्ग कमी झाला आहे. करोनाच्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध हटवले आहेत. शाळा आणि कॉलेजेसही सुरू झाले आहेत. अशात आता चिंता वाढवणारी बातमी आली आहे. काही देशांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. खासकरून चीन, दक्षिण कोरिया, हाँगकाँगसह अनेक आशियाई देशांमध्ये रुग्ण वाढत आहे. यामुळे भारतात आता चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2022, 10:15 am
पुणे/नवी दिल्ली : चीन, दक्षिण कोरिया, हाँगकाँगसह आशियातील अनेक देशांना करोना व्हायरसच्या ( coronavirus ) आणखी एका लाटेचा सामना ( covid fourth wave fears ) करावा लागत आहे. फ्रान्स, इंग्लंड, इटली आणि युरोपातील इतर देशांमध्ये करोनाचा वाढत असलेला संसर्ग हा भयावह आहे. भारतातही चौथी लाट येण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. त्यामुळे बाहेरून संसर्ग भारतातही पसरू शकतो. इतर देशांमध्ये जे घडले, तशीच परिस्थिती भारतातही दिसली पाहिजे, असे आवश्यक नसल्याचे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले. 'राज्यांमध्ये निर्बंधात देण्यात येत असलेली सूट ही कायम राहिली पाहिजे. सार्वजनिक आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच भीतीने जगण्याचा असू शकत नाही, असे आयसीएमआरचे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronavirus india covid fourth wave fears icmr expert
भारतात करोनाची संसर्गाची चौथी लाट येण्याची भीती? ICMR च्या तज्ञांनी सांगितले ( file photo )


केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारी बाळगण्याचे निर्देश दिल्यानंतर डॉ. पांडा यांनी ही माहिती दिली. नागरिकांनी मास्क वापरणे सुरू ठेवले पाहिजे आणि लसीकरण वाढवले पाहिजे. स्पष्ट कृतीसाठी अधिक डेटा आवश्यक आहे. पण भारताने सावधगिरीने अधिक निर्बंध हटवण्याचा विचार केला पाहिजे. आपण सावध असले पाहिजे आणि देखरेख ठेवणे आणि स्वच्छता राखली पाहिजे, असे पांडा म्हणाले.

चीन, हाँगकाँग आणि युरोपच्या काही भागांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रत्येक देश संसर्ग टाळण्यासाठी स्वतःची योजना बनवतो. त्यामुळे आता एका देशाचा परिणाम दुसऱ्या देशात दिसणार नाही. कुठेतरी रुग्ण वाढले तर त्याचा अर्थ इथेही तसेच होईल असे नाही. एक देश म्हणून आपण जिनोमिक आणि सेंटिनल सर्विलन्स वाढवली पाहिजे. भारताने करोना विरूद्धच्या लढाईत वेगवेगळ्या लसींचा वापर केला आहे, असेही डॉ. पांडा यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

भारतात चौथ्या लाटेची भीती

भारतात रविवारी १,७६१ नवीन रुग्ण आढळून आलेत आणि १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात करोनावरील लसीचे १,८१,२१,११,६७५ डोस देण्यात आले आहेत. त्याचा परिणाम कोविड संसर्ग दरावरही दिसून येत आहे. भारतात सध्या करोनाचे २६,२४० सक्रिय रुग्ण आहेत. करोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने देशात २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. हे पाहता भारतातही चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण यामुळे घाबरण्याची भीती नाही. ही लाट आलीच तर ती फार धोकादायक नसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ओमिक्रॉनच्या डबल व्हेरियंटनं वाढवलं टेन्शन, करोनाची नवी लाट येणार का? सर्व काही जाणू

करोनाबाबत केंद्राचा राज्यांना इशारा

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करोनाबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. आशियाई देश आणि युरोपीय देशांमध्ये वाढत्या करोना रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा संदेश देण्यात आला आहे. राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना भूषण यांनी पत्र पाठवले आहे. वाढत्या आर्थिक आणि इतर सार्वजनिक उपक्रमांमुळे करोनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांना करोनाशी संबंधित नियम आणि उपाययोजनांबाबत जागरूक करा. नियम पाळा, असे या पत्रात म्हटले आहे.

चीनमध्ये लॉकडाऊन, भारताला अलर्ट; करोना पुन्हा उंबरठ्यावर

महत्वाचे लेख