अ‍ॅपशहर

बालमृत्यू प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा बंद पडून ६० बालकांचा मृत्यू झाल्या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 25 Aug 2017, 3:00 am
वृत्तसंस्था, लखनौ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gorakhpur deaths fir against 9 addl chief secy shunted
बालमृत्यू प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा बंद पडून ६० बालकांचा मृत्यू झाल्या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गोरखपूर येथील बीआरडी मेडिकल कॉलेजच्या माजी प्राचार्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. रुग्णालयाला द्रव ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या ‘मेसर्स पुष्पा सेल्स’ या कंपनीचे नावही ‘एफआयआर’मध्ये आहे.

गोरखपूर येथील बालमृत्यू प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने अतिरिक्त मुख्य सचिव (वैद्यकीय शिक्षण) अनीता भटनागर जैन यांची बदली केली असल्याचेही सरकारी प्रवक्त्यांनी सांगितले. ‘गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बीआरडी कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. राजीव मिश्रा, त्यांच्या पत्नी डॉ. पूर्णिमा शुक्ला, डॉ. काफील खान आणि ‘मेसर्स पुष्पा सेल्स’च्या संचालकांचा समावेश आहे,’ अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (लखनौ झोन) अभय प्रसाद यांनी दिली. हे प्रकरण गोरखपूरला वर्ग करण्यात आले आहे.

गोरखपूरमध्ये ११ ऑगस्टला बालमृत्यू प्रकरण घडले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १२ ऑगस्टला या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. डॉ. राजीन मिश्रा, डॉ. पूर्णिमा शुक्ला, तसेच मेडिकल कॉलेजच्या अकाउंट विभागातील कर्मचारी, तसेच मुख्य फार्मसिस्ट गजानन जैस्वाल यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस समितीने केली होती. गेल्या तीन वर्षांत मेडिकल कॉलेजने केलेल्या औषध आणि रसायन खरेदीचे विशेष ‘कॅग’ लेखापरीक्षण करण्यासही समितीने सांगितले होते. याशिवाय खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी डॉ. खान यांच्याविरोधात फौजदारी करावाई करण्यासही समितीने सांगितले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समितीचा अहवाल स्वीकारून सर्व दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज