अ‍ॅपशहर

पुढच्या २४ तासांत 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी

India Monsoon Update : भारतीय हवामान विभागाकडून देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहेत. तसंच काही राज्यांना येलो आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jul 2021, 9:28 am
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसानं महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांना झोडपून काढलंय. महाराष्ट्रात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेनं मात्र अनेकांना खडबडून जागं केलंय. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. तसंच काही राज्यांना धोका टाळण्यासाठी अलर्टही करण्यात आलंय. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज झारखंड आणि बिहारमध्ये बेफाम पावसाची शक्यता आहे. तसंच राजधानी दिल्लीतही मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india monsoon update warning of heavy rain in these states in the next 24 hours alert issued
पुढच्या २४ तासांत 'या' राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी


​राज्यांना इशारा


आयएमडीच्या म्हणण्यानुसार, २६ ते २८ जुलै दरम्यान हिमाचल प्रदेश, हरयाणा यांसहीत उत्तर प्रदेशातही पाऊस दाणादाण उडवून देऊ शकतो. तसंच २७ ते २८ जुलै दरम्यान पंजाब, पूर्व उत्तर प्रदेशातही पावसाचा जोर दिसून येण्याची चिन्हं आहेत. २७ ते २८ जुलै दरम्यान हिमाचल आणि उत्तराखंडातही पावसाचं उग्र रूप पाहायला मिळू शकतं.


​उत्तर प्रदेशलाही अलर्ट

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील काही भागांत येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या प्रशासनाला अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत हलका - मध्यम पाऊसही पडू शकतो.


​दिल्लीत जोरदार वाऱ्याची शक्यता

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांत हलक्या पावसासोबत तापमानात घट दिसून येऊ शकते. या दरम्यान हवेचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असू शकतो. राजधानी दिल्लीला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.


​बिहारमध्ये येलो - ऑरेंज अलर्ट

बिहारमध्येही येत्या २४ ते ४८ तासांत मोठ्या पावसाची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण भागात पावसासोबत वीजांच्या कडकडाटही दिसून येऊ शकतो. राज्याला २६ ते २९ जुलैपर्यंत येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.


महत्वाचे लेख