अ‍ॅपशहर

Indore Temple Accident: हृदयद्रावक! सोबत जगले अन् सोबतच जग सोडले; ११ जणांचा करुण अंत; एकाचवेळी चिता पेटल्या

Indore Temple Tragedy: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये विहिरीवरील छत कोसळून ३५ भाविकांचा दुर्दैवी अंत झाला. यापैकी ११ जण एकाच भागातील रहिवासी होते. ते एकमेकांचे शेजारी होते.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2023, 11:53 am
इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये दोन दिवसांपूर्वी विहिरीवरील छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. रामनवमीच्या उत्सवादरम्यान विहिरीच्या छतावर मोठी गर्दी जमली होती. त्यावेळी अचानक छत कोसळून भाविक विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ११ जण पटेल नगरचे रहिवासी होते. बालेश्वर महादेव मंदिरातील विहिरीवरील छत कोसळल्यानं घडलेल्या दुर्घटनेमुळे पटेल नगरावर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Indore Temple Tragedy


विहिरीवरील छत कोसळून एकूण ३५ भाविकांचा जीव गेला. यापैकी ११ जण पटेल नगरचे रहिवासी होते. हे रहिवासी अनेक वर्षांपासून सोबत राहायचे. कित्येक वर्षे सोबत राहिलेल्या शेजाऱ्यांना मृत्यूनंदेखील एकाचवेळी गाठलं. त्यांच्या केवळ आठवणी शिल्लक राहिल्या आहेत. अनेक कुटुंबांनी या दुर्घटनेत आपल्या जवळच्यांना गमावलं. अनेक घरांवर दु:खाचा डोंगर कोसळल्यानं कोणी कोणाचं सांत्वन करावं हा प्रश्न आहे. संपूर्ण पटेल नगरवर शोककळा पसरली आहे.
स्मशानात रोज रात्री प्रेतयात्रा यायच्या, चिता पेटायच्या; संशयावरून पोलिसांचा छापा अन् मग...
पटेल नगरमधील अनेकजण बालेश्वर महादेव मंदिरात रामनवमी उत्सवासाठी गेले होते. अनेक शेजारी सोबतच मंदिरात गेले होते. यातील ११ जणांना मृत्यूनं गाठलं. त्यांच्यावर स्मशानभूमीत एकाचवेळी अंत्यविधी झाले. आपल्या कुटुंबीयांना, शेजाऱ्यांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाले. गुरुवारी रात्रीपासून पटेल नगरात गर्दी जमू लागले. नातेवाईकांच्या निधनाबद्दल समजातच अनेकांनी पटेल नगराकडे धाव घेतली. धाय मोकलून रडणाऱ्यांपैकी काही जण बेशुद्ध पडले. त्यामुळे डॉक्टरांना बोलावण्यात आलं.

मृतदेह आणण्यासाठी गुजराती समजानं ११ वाहनांची व्यवस्था केली होती. शाळांच्या बसेसचं रुपांतर रुग्णवाहिकांमध्ये करण्यात आलं. बसेसमधून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले. या बसेस परिसरातून जात असताना अनेकांचे डोळे पाणावले. 'गुरुवारी परिसरात रामनवमीचा उत्साह होता. मात्र एका क्षणात सगळंच बदललं. एका दुर्घटनेनं ३५ जणांना हिरावून नेलं. आमच्या परिसरातील अनेक घरांमध्ये चूल पेटली नाही,' असं पटेल नगरचे रहिवासी असलेल्या रमेश पटेल यांनी सांगितलं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख