अ‍ॅपशहर

गो-भक्तीच्या नावाखाली हत्या नामंजूर!: मोदी

'या देशात कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही,' असं सांगतानाच, 'गो-रक्षणाच्या वा गो-भक्तीच्या नावाखाली माणसांची हत्या करणं कदापि खपवून घेतलं जाणार नाही,' अशी सक्त ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वयंघोषित गोरक्षकांना दिली.

Maharashtra Times 29 Jun 2017, 2:36 pm
मटा ऑनलाइन वृत्त । साबरमती/अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम killing in the name of cow worship is not acceptable says pm modi
गो-भक्तीच्या नावाखाली हत्या नामंजूर!: मोदी


'या देशात कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही,' असं सांगतानाच, 'गो-रक्षणाच्या वा गो-भक्तीच्या नावाखाली माणसांची हत्या करणं कदापि खपवून घेतलं जाणार नाही,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वयंघोषित गोरक्षकांना पुन्हा एकदा फटकारले.

गोरक्षणाच्या नावाखाली गेल्या काही दिवसांत अनेक राज्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं समाजातील काही वर्गांमध्ये भीतीची व नाराजीची भावना आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज यावर थेट भाष्य केलं. महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या जीवनातील दाखले देत मोदींनी यावेळी गोरक्षकांना कानपिचक्या दिल्या. 'हिंसेनं आजवर कुठलाही प्रश्न सुटला नाही आणि भविष्यातही सुटणार नाही. शिवाय, भारत ही अहिंसेची भूमी आहे. महात्मा गांधी यांची जन्मभूमी आहे, हे विसरता येणार नाही. गो-रक्षणासाठी गांधीजी आणि विनोबांच्या इतकं काम आजवर कुणीही केलेलं नाही. गायींची रक्षा व्हायलाच हवी. पण त्याच्या नावाखाली सध्या जे काही चाललंय, तो गांधीजींचा व विनोबांचा रस्ता असू शकत नाही. गो भक्तीच्या नावाखाली माणसांची हत्या करणं कुणालाही मान्य होणार नाही. असं होणं दुर्दैवी आहे,' असं मोदी म्हणाले.

...आणि मोदी भावूक झाले!

गोरक्षकांना खडे बोल सुनावताना मोदी यांनी आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. त्यांच्या गावातील एका गायीला प्रत्येक घरातून रोज भाकरी दिली जायची. एक दिवस याच गायीच्या पायाखाली येऊन एका घरातील चिमुकला दगावला. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी झालेला एकुलता एक मुलगा गमावल्यानं त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांचं सर्वस्वच गेल्यासारखं झालं. पण त्यांनी गायीवर राग धरला नाही. गावातल्या इतर लोकांप्रमाणेच त्यांनीही दुसऱ्या दिवशी गायीच्या तोंडापुढं भाकर धरली. पण गायीनं ती भाकर खाल्ली नाही. गावातील कुणाकडचीही भाकर खाल्ली नाही. आपल्या पायाखाली एक चिमुकला गेल्याचं दु:ख त्या गायीलाही झालं होतं. तिनं पूर्णपणे अन्नाचा त्याग केला आणि अखेर तिचा मृत्यू झाला. एवढा त्याग आणि समर्पण गायीच्या ठिकाणी असतं. अशा गायीच्या नावाखाली होणारी हिंसा मनाला प्रचंड वेदना देते,' असं सांगताना मोदी भावूक झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज