अ‍ॅपशहर

lalu prasad yadav: नितीशकुमारांना महाआघाडीत यायचं होतं, पण मीच घेतलं नाही: लालू

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा महाआघाडीत यायचं होतं, पण मीच त्यांना महाआघाडीत घेतलं नाही, असा गौप्यस्फोट आरजेडी नेते लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2019, 9:56 am
नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा महाआघाडीत यायचं होतं, पण मीच त्यांना महाआघाडीत घेतलं नाही, असा गौप्यस्फोट आरजेडी नेते लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitish-lalu


लालू प्रसाद यादव यांचं 'गोपालगंज टु रायसीना: माय पॉलिटिकल जर्नी' हे आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. या पुस्तकात त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. महाआघाडीला सोडून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर सहा महिन्यातच नितीशकुमार पुन्हा महाआघाडीत यायला उत्सुक होते. त्यांनी जेडीयूचे उपाध्यक्ष आणि त्यांचे विश्वासू सहकारी प्रशांत किशोर यांना एक नव्हे पाचवेळा माझ्याकडे पाठवून माझी मनधरणीही करण्याचा प्रयत्न केला. पण मी नितीशकुमार यांना महाआघाडीत घेण्यास विरोध केला. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस होता म्हणून नव्हे तर त्यांच्यावरचा विश्वास उडून गेल्यानेच मी त्यांना महाआघाडीत घेण्यास विरोध केला होता, असंही ते म्हणाले.

जेडीयूला मी लिखित पाठिंबा दिला तर नितीशकुमार भाजपची साथ सोडून महाआघाडीत येतील, असं सांगण्याचा प्रशांत किशोर यांनी भरपूर प्रयत्न केला. पण मी त्याला दाद दिली नाही, असंही लालू यांनी स्पष्ट केलं. मी प्रशांत किशोर यांचा प्रस्ताव स्वीकारला असता तर २०१५ मध्ये भाजपच्या विरोधात मतदान करणाऱ्यांची प्रतिक्रिया काय उमटली असती ते मला सांगता येणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. लालूंनी हे पुस्तक नलिनी वर्मा यांच्या सहकार्याने लिहलं असून रुपा पब्लिकेशनकडून हे पुस्तक प्रकाशित केलं जाणार आहे.

दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या या दाव्याचं जेडीयूचे महासचिव केसी त्यागी यांनी खंडन केलं आहे. २०१७ नंतर नितीशकुमार यांनी कधीच महाआघाडीत जाण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. असं काही असतं तर हा प्रस्ताव पक्षांतर्गत चर्चेसाठी ठेवण्यात आला असता. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नितीशकुमार कधीच तडजोड करणारे नाहीत. त्यामुळे लालूंचा दावा खोटा असल्याचं त्यागी यांनी स्पष्ट केलं.

त्यागी यांनी लालूंचा दावा नाकारला असला तरी प्रशांत किशोर यांनी मात्र लालूचं म्हणणं नाकारलंही नाही आणि मान्यही केलं नाही. मी काहीच बोलणार नाही आणि काहीही कन्फर्म करणार नाही. तुम्हाला हवं ते तुम्ही लिहू शकता, असं सूचक वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज