अ‍ॅपशहर

​कर्नाटकात धमाका; BJP आमदार पुत्राला ४० लाखाची लाच घेताना पकडलं, घरात सापडले ६ कोटी

Karnataka News : महाराष्ट्रात कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालावरून राजकारण रंगलं आहे. विरोधी पक्षांनी भाजपला लक्ष्य केलं असताना शेजारी राज्य कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धमाका झाला आहे. आमदार पुत्राला लाखोंची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

Authored byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Mar 2023, 4:43 pm
बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात खळबळ निर्माण करणारी घटना घडली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या घटनेने भाजपवर शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. भाजप आमदाराचा पुत्र ४० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला आहे. विशेष म्हणजे आमदाराच्या ऑफिसमध्येच हा प्रकार सुरू होता. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lokayukta-raid
कर्नाटकात धमाका; BJP आमदार पुत्राला ४० लाखाची लाच घेताना पकडलं, घरात सापडले ६ कोटी


बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे मुख्य लेखाकार व्ही प्रशांत मदल यांना कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी ४० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. विशेष म्हणजे रंगेहाथ पकडल्यानंतर लोकायुक्ताकडून तपास मोहीम राबवण्यात आली आणि प्रशांत मदलकडून ६ कोटीहून अधिकच रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रशांत मदल हे चन्नगिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार के. मदल विरुपक्षप्पा यांचा पुत्र आहेत. ही कारवाई एका माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे. संजयनगरमधील डॉलर्स कॉलनीत प्रशांत यांच्या घरावर छापा टाकला.

गुरुवारी सकाळी या प्रकरणी तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला होता. आमदार पुत्राने ज्या व्यक्तीकडून ८१ लाखांची लाच मागितली होती त्याने केलेल्या तक्रारीवरून एफआयआर आधीच दाखल करण्यात आला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रशांत यांच्या घरी छापा टाकला. त्या ठिकाणी ६ कोटीची रोकड आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे.

निविदा मंजूर करण्यासाठी प्रशांत यांनी ८१ लाखा रुपयांची लाच मागितली होती. यात ४० लाखांची लाच स्वीकारताना त्यांच्या कार्यालयात त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं. प्रशांत यांना लोकायुक्ताकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी कागदपत्रांची तपासणी आणि कारवाई सुरू आहे.

आमदाराचीही होणार चौकशी

कर्नाटक साबण आणि डिटर्जंट लिमिटेडला (KSDL) कच्चा माल उपलब्ध करण्यासाठी निविदा मंजूर करण्यावरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रशांतचे वडील म्हणजे आमदार के. मदल विरुपक्षप्पा हे केएसडीएलचे अध्यक्ष आहेत. यामुळे लोकायुक्त अधिकारी त्यांचीही चौकशी करणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण वडिलांच्या वतीनेच आमदार पुत्र लाच घेताना पकडला गेल्याचा आरोप आहे.

आमदार पुत्र प्रशांत याना पकडण्यात आलं होतं, त्या आमदाराच्या कार्यालयातून १.२ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती लोकायुक्ताकडून देण्यात आली आहे.

नागालँडमध्ये पवारांचे 'नरेंद्र' जोरात; विश्वासू साथीदाराचा धमाका; NCPची नागालँड मोहीम फत्ते
मुख्यमंत्री बोम्मई यांची प्रतिक्रियाआमदाराच्या पुत्रावर लोकायुक्ताकडून छापा टाकण्यात आला आहे. राज्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकायुक्त पुन्हा कार्यन्वीत करण्यात आलं आहे. लोकायुक्त नसल्याने काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आली आणि ती बंद केली गेली, असं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले. स्वतंत्र आणि निपक्ष चौकशी होईल. दोषींना शिक्षा करण्याचं आमचं लक्ष्य आहे. लोकायुक्ताकडे सर्व माहिती आहे. तो कोणाचा पैसा आहे आणि तो कुठून आला आहे. सर्वकाही तपासानंतर बाहेर येईल, असं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.
लेखकाबद्दल
सचिन फुलपगारे
सचिन फुलपगारे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत, मीडियामध्ये काम करण्याचा १९ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्यांशी निगडीत प्रश्न आणि मुद्द्यांवर काम करण्यात आवड आहे. सतत नवीन शिकण्याची तयारी.... आणखी वाचा

महत्वाचे लेख