अ‍ॅपशहर

ममता दीदी कडाडल्या; अमित शहांवर केली 'ही' टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्य्युअल रॅलीसाठी ७० हजार एलईडी स्क्रीन वापरण्यात आल्याचे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. हे फक्त भारतीय जनता पक्षालाच परवडू शकते असा टोलाही ममतादीदींनी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाला लगावला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jun 2020, 8:25 pm
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअल रॅलीवर टीकास्त्र सोडले आहे. अमित शहा यांच्या व्हर्च्युअल रॅलीसाठी ७० हजार एलईडी स्क्रीन वापरले गेले असे सोशल मीडियावर वाचायला मिळते, असे सांगत हे फक्त भारतीय जनता पक्षालाच परवडू शकते अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी शहा आणि भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. या वेळी करोनाच्या वाढत्या संसर्गावरही त्यांनी भाष्य केले. लोक प्रवास करत असल्यामुळे करोनाचा प्रसार जलद होत असल्याचे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ममता बॅनर्जी आणि अमित शहा


बंगालमध्ये राहणारे स्थलांतरित मजूर येथे आनंदाने राहत आहेत याचा मला आनंद आहे. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत यायचे नाही. परंतु आपल्या राज्यातील स्थलांतरित मजूर इतर राज्यांत अनेक संकटांना सामोरे जात आहेत, याकडेही ममतादीदींनी लक्ष वेधले आहे.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, आम्ही जागतिक बँकेकडून विशेष कर्ज घेतले असून त्यापैकी १,०५० कोटी रुपये लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहेत. तर ८५० कोटी रुपये पेन्शन आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर खर्च केले जातील.

३० जूनपर्यंत लॉकडाउनची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्या पुढे म्हणाल्या. यासह, कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक देखील मृतदेहाचे अंतिम दर्शन करू शकतील. तसेच, आम्ही लग्नाच्या सोहळ्यामध्ये आणि मंदिरात एकत्र येण्यासाठी १० ते २५ लोकांना परवानगी दिली आहे, असेही त्या म्हणाल्या.

केवळ संघटित शक्तीच दु:ख सहन करू शकते हे कायम लक्षात ठेवा असेही त्या म्हणाल्या. आतापर्यंत २० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनाही संसर्ग झाला आहे. या कठीण काळात हेच लोक करोनाशी थेट लढा देत आहेत, असेही ममतादीदी पुढे म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज