अ‍ॅपशहर

यूपीत बसपाचे ९९ मुस्लिम उमेदवार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 'व्होट बँके'चं राजकारण जोरात रंगू लागलं असून बसपा अध्यक्षा मायावती यांनी भाजप आमदाराच्या हत्येच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेला गँगस्टर मुख्तार अंसारीला पक्षात मानाचं पान दिलं आहे. अन्सारीच्या नेतृत्वाखालील कौमी एकता दल बसपामध्ये विलीन झालं असून समाजवादी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Pankaj Shah | Maharashtra Times 27 Jan 2017, 10:13 am
टाइम्स न्यूज नेटवर्क । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mayawati ropes in mukhtar fields 99 muslims
यूपीत बसपाचे ९९ मुस्लिम उमेदवार


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 'व्होट बँके'चं राजकारण जोरात रंगू लागलं असून बसपा अध्यक्षा मायावती यांनी भाजप आमदाराच्या हत्येच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेला गँगस्टर मुख्तार अंसारीला पक्षात मानाचं पान दिलं आहे. अन्सारीच्या नेतृत्वाखालील कौमी एकता दल बसपामध्ये विलीन झालं असून समाजवादी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मायावती यांनी अल्पसंख्याक मतांवर डोळा ठेऊन तशी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षातील गृहकलहाचा फायदा घेत सपाच्या छोट्या मित्रांना बसपाकडे खेचण्याची चाल त्या खेळत आहेत. त्यातूनच त्यांनी उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात प्रभाव असलेल्या मुख्तार अन्सारीला पक्षाचे दार उघडले आहे.

कौमी एकता दलाच्या विलीनीकरणाबरोबरच मुख्तार अन्सारीला मऊ मतदारसंघातून, त्याचा मुलगा अब्बासला घोसी मतदारसंघातून तर मोठा भाऊ शिबगतुल्ला याला मोहम्मदाबादमधून बसपाचं तिकीट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या तीन मुस्लिम उमेदवारांची भर पडल्यानंतर बसपाच्या एकूण मुस्लिम उमेदवारांची संख्या ९९ इतकी झाली आहे.

मुस्लिम उमेदवारांबाबत मायावती यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. अल्पसंख्याकांच्या हितांसाठी बसपा कटिबद्ध आहे आणि नेहमीच पक्ष त्यांच्यामागे उभा राहिल, असे मायावती म्हणाल्या.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये १९ टक्के मुस्लिम मतदार असून २१ टक्के दलित मतं आहेत. यंदाच्या निवडणुकीचा विचार केल्यास मायावती यांनी मुस्लिम उमेदवारांच्या तुलनेत कमी म्हणजेच ८७ दलित उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहेत.

- भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी मुख्तार अन्सारी सध्या जेलमध्ये आहे.

- अन्सारीवर राय यांच्या हत्येचा गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. त्याला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे, असे सांगत मायावती यांनी अन्सारीचं समर्थन केलं.

- डी. पी. यादव, राजाभैया, अतिक अहमद, ब्रिजेश सिंग आणि रमाकांत यादव हे खरे गुन्हेगार आहेत आणि त्यांना सपा व भाजपने आश्रय दिला आहे. बसपात अशा लोकांना थारा नाही, असा दावाही मायावती यांनी केला.

- गेल्या ऑक्टोबर महिन्यात अन्सारी कौमी एकता दलाचं सपामध्ये विलीनकरण करणार होता. मात्र सपातील गृहकलहातून अनेक गणितं बदलली.
लेखकाबद्दल
Pankaj Shah

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज