अ‍ॅपशहर

gurugram: 'पाकिस्तानात जा' म्हणत जमावाकडून कुटुंबावर हल्ला

‘देशात राहायचे नसेल तर पाकिस्तानात जा..’ असं म्हणत एकाच घरातील १२ जणांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरूग्राममध्ये घडला आहे. क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून गावांतील २०-२५ जणांनी घरात घुसून मोहम्मद दिलशाद आणि त्याच्या कुटुंबीयांवर काठ्या,हॉकी स्टीक आणि लोखंडी रॉडनं हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2019, 12:56 pm
गुरूग्राम:

‘देशात राहायचे नसेल तर पाकिस्तानात जा..’ असं म्हणत एकाच घरातील १२ जणांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरूग्राममध्ये घडला आहे. क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादातून गावांतील २०-२५ जणांनी घरात घुसून मोहम्मद दिलशाद आणि त्याच्या कुटुंबीयांवर काठ्या, हॉकी स्टीक आणि लोखंडी रॉडनं हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुरूग्राममधील भोंडसी परिसरात गुरूवारी संध्याकाळी हा प्रकार घडलाय. मोहम्मद दिलशाद यानं दिलेल्या माहितीनुसार, 'दुपारी ३ च्या सुमारास तो आपल्या शेजारच्या काही मित्रांसोबत क्रिकेट खेळायला बाहेर पडला. काही वेळाने गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील ८-९ तरुण बाईक घेऊन मैदानात आले. तुम्ही लोक इथे काय करत आहात? तुम्ही पाकिस्तानात जा' असं म्हणत मोहम्मद दिलशाद आणि त्याच्या मित्रांवर दमदाटी करू लागले. या दोन्ही गटात थोडी शाब्दिक चकमक झाल्यानं मोहम्मद दिलशादनं मॅच थांबवली आणि सगळे तिथून निघून गेले. परंतु, संध्याकाळी ५-५.३० च्या दरम्यान तिच मुलं अजून २०-२५ जणांना घेऊन मोहम्मद दिलशादच्या घरी धडकली. त्यांच्या हातात काठ्या, लोखंडी रॉड, हॉकी स्टिक होत्या. दिलशाद सांगतो की, 'संध्याकाळी अचानक २०-२५ जण आमच्या घराबाहेर आले आणि दगडफेक करू लागले. आमच्या गाड्यांची तोडफोड करू लागले.आम्ही आमच्या घरातील मुलींना आणि महिलांना दुसऱ्या मजल्यावर लपायला सांगितले. परंतु, त्यांनी घरात घुसून मला माझ्या काकांना आणि माझ्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली. आम्ही पोलिसांना फोन करण्याचा बराच वेळ प्रयत्न केला. पण आम्हाला मारून मारेकरी पळून गेल्यावर पोलीस घरी पोहोचले.'

मारहाणीत जखमी झालेली समीरा सांगते, 'आम्ही सगळे वरच्या मजल्यावर दारं बंद करून लपलो होतो. हातात काठ्या,लोखंडी रॉड, हॉकी स्टिक घेऊन ही सगळी मंडळी घरात शिरली. त्यांनी तिजोरी फोडून त्यातून २५ हजार रुपये आणि दागिने चोरले. त्यानंतर ते वर येऊन आमचा दरवाजा तोडायचा प्रयत्न करू लागले. पण कडी न निघाल्याने त्यांनी खिडकी तोडली आणि ते आत आले. त्यांनी मला काठ्यांनी प्रचंड मारले, माझ्या डोक्यावरही वार केले. डोक्यावर मार लागल्यानं मी तिथंच बेशुद्ध पडले.'
जमावाकडून होणारा हा मारहाणीचा सगळा प्रकार २१ वर्षीय दानिस्थानं तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. दानिस्ता सांगते, 'आम्ही ७ जणी दुसऱ्या मजल्यावर स्वत:ला खोलीत बंद करून घेतले होते. पहिल्या मजल्यावर हे लोकं माझ्या कुटुंबातील सदस्यांना मारत असताना मी माझ्या फोनमध्ये एका मिनिटाचे तीन व्हिडिओ रेकॉर्ड केले. पण त्यांच्यापैकी एकानं मला व्हिडिओ रेकॉर्ड करताना पाहिले आणि त्या मुलीला धरा, तिचा मोबाईल ताब्यात घ्या' असं म्हणत ते वर यायला धावले. मी माझा फोन टाइल्समध्ये लपवला. त्यांना आमचा दरवाजा तोडता आला नाही. पण त्यांचे चेहरे व्हिडिओत दिसतील या भीतीनं ते सगळे पळून गेले.

या हल्ल्यानंतर भोंडसी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या १२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज