अ‍ॅपशहर

मोदी सरकारची ६ वर्षे पूर्ण; 'ही' आहेत आव्हाने

केंद्रातील मोदी सरकारला आज ६ वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. सरकारची सहा वर्षे पूर्ण होत असताना मोदी सरकारपुढे अनेक मोठी आव्हाने उभी ठाकलेली आहेत. यात बेरोजगारी, करोना, चीनचे आव्हान असे प्रश्न आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2020, 1:37 pm
नवी दिल्ली: २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच केंद्रात स्वत:च्या बळावर सरकार स्थापन केले. त्यानंतर सन २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकालाला वर्षाचा काळ पूर्ण होत आहे. तर त्यांच्या पंतप्रधानपदाला आज एकूण ६ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, सन २०२० हे वर्ष मोदी सरकारपुढे अनेक आव्हानांसह उभे ठाकले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम मोदी सरकारला ६ वर्षे पूर्ण


करोना विषाणूचा प्रकोप

या वर्षाची सुरुवात करोनाचे संकट घेऊनच सुरू झाले होते. तेव्हापासून आतपर्यंत करोना रुग्णांची संख्या जलदगतीने वाढत जाऊन ती सुमारे दीड लाखांच्या आसपास पोहोचली आहे. या साथीच्या आजाराने ४ हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतलेला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी पुरेसे बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि सर्व उपकरणे उपलब्ध असल्याचा सरकारचा दावा आहे. परंतु सर्वात मोठी समस्या ही आहे की जोपर्यंत ही लस सापडत नाही, तोपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे. जगभरात या आजाराचा प्रकोप वाढलेला आहे.

लॉकडाउनमध्ये गेल्या नोकऱ्या

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, दुकाने, रेल्वे-मेट्रो, महामार्ग सेवा, बस, मॉल्स सर्व बंद आहेत. यामुळे मजूर आणि कामगारांकडे काम नसल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर रोजी-रोटीचे संकट उद्भवले आहे. मोठ्या कंपन्यांनीही टाळेबंदी सुरू केली आहे. स्थलांतरित कामगारही आपल्या राज्यांमध्ये परतायला लागलेले आहेत.

सीमेवर चीनचे आव्हान

चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणू पसरल्यामुळे संपूर्ण जग चीनकडे संशयाने पाहत आहेत. दरम्यान, भारताबरोबर चीनचे संबंधही कमालीचे ताणले गेले आहेत. लडाखमध्ये बीआरओच्या कामकाजावर आक्षेप घेण्यात आला. तसेच येथे सैनिकांची संख्याही वाढवली गेली आहे. चीनी सैन्याचा अनेक वेळा भारतीय सैन्याशी संघर्षही झालेला आहे.

टोळ किटकांचा हल्ला

दरम्यान, आफ्रिकन देशांतील टोळांनी देशातील शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण केले आहे. यामुळे हजारो कोटी रुपयांच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशानंतर ते आता महाराष्ट्रातील विदर्भात पोहोचले आहेत. यूपीच्या झासीमध्ये अग्निशमन दलाला उद्या रसायनांसह तयार रहाण्यास सांगण्यात आलेले आहे. तब्बल २७ वर्षांनंतर टोळाचा असा हल्ला झालेला आहे.

आर्थिक आघाडीवर आव्हान

संपूर्ण जग आर्थिक मंदीकडे वाटचाल करीत आहे अशी भीती सन २०१९ पासूनच व्यक्त केली जात होती. अशात देशात कोरोन विषाणूचे संकट आलेले आहे. आपापल्या घरी पोहोचलेल्या स्थलांतरित मजुरांना रोजगार पुरविणे हे एक मोठे आव्हान आहे. भारतात पूर्वीच बेरोजगारीची मोठी समस्या आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज