अ‍ॅपशहर

‘भारतात राहणारे मुस्लिम हे देखील हिंदूच आहेत’

‘सर्व प्रकारच्या समूदायांना सामावून घेणे म्हणजेच हिंदुत्व’, असा विचार मांडत, ‘भारतात राहणारे मुस्लिम हे देखील हिंदूच आहेत’, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले.

Maharashtra Times 18 Dec 2017, 2:45 am
वृत्तसंस्था, आगरतळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम muslims in india are also hindus rss chief mohan bhagwat
‘भारतात राहणारे मुस्लिम हे देखील हिंदूच आहेत’


‘सर्व प्रकारच्या समूदायांना सामावून घेणे म्हणजेच हिंदुत्व’, असा विचार मांडत, ‘भारतात राहणारे मुस्लिम हे देखील हिंदूच आहेत’, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले.

ईशान्य भारतातील संघाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी सरसंघचालक पाच दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानात संघाच्या वतीने एक जाहीर कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. त्यात सरसंघचालक भागवत यांनी वरील वक्तव्य केले.

‘आमचे कुणाशीही शत्रुत्व नाही. सगळ्यांचे कल्याण व्हावे, अशीच आमची इच्छा आहे. सगळ्यांना सामावून घेणे, एकत्र करणे हीच हिंदुत्वाची व्याख्या आहे’, असे भागवत म्हणाले. ‘भारत ही हिंदूंची भूमी आहे. जगभरातील विविध देशांत छळवादाचा सामना करावा लागलेले असंख्य ‘हिंदू’ भारतात आले आणि येथे त्यांना आश्रय मिळाला. भारतातील मुस्लिम हे त्या अर्थाने हिंदूच आहेत. सत्य या मूल्यावर हिंदूंची श्रद्धा आहे. मात्र जगात मान आहे तो ताकदीला आणि ताकद ही संघटनेत असते’, अशी पुस्ती त्यांनी पुढे जोडली.

‘सन १९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीमुळे हिंदुत्वाची भावना दुबळी झाली व हिंदू समाजही अवनत झाला. मात्र आज सारे जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. ज्या जगात भौतिकवाद व आदर्शवाद हे दोन्ही सुखाने एकत्र नांदतील अशा जगाची निर्मिती करण्याबाबत भारताकडे आशेने पाहिले जात आहे’, असे सरसंघचालक म्हणाले.

‘हिंदूंनी संघटित व्हावे आणि संघाच्या शाखांमध्ये प्रशिक्षण घ्यावे. देशबांधणी व स्वविकास यांसाठी योग्य ती दिशा दाखवणारे हे एकमेव ठिकाण आहे’, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज