अ‍ॅपशहर

मुस्लिम असला तरी जावई माझा भला!: स्वामी

'माझा जावई मुस्लिम असला तरी अत्यंत चांगला मुलगा आहे. त्यामुळं मी आनंदानं माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिलंय.'हे उद्गार आहेत अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या चळवळीला पुन्हा गती देऊ पाहणारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे.

Maharashtra Times 20 May 2016, 11:53 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम my son in law is a muslim
मुस्लिम असला तरी जावई माझा भला!: स्वामी


'माझा जावई मुस्लिम असला तरी अत्यंत चांगला मुलगा आहे. त्यामुळं मी आनंदानं माझ्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिलंय.'

हे उद्गार आहेत अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या चळवळीला पुन्हा गती देऊ पाहणारे भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे. तब्बल १५ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा संसदेत प्रवेश केलेल्या स्वामी यांनी नुकतीच 'आउटलुक' या साप्ताहिकाला सविस्तर मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राजकारण, अर्थकारणापासून ते कौटुंबिक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. बेधडक मतं मांडण्यासाठी ओळखले जाणाऱ्या व गांधी घराण्याचे कडवे विरोधक असलेल्या स्वामी यांनी सध्या राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे. त्याबद्दल बोलताना त्यांनी हिंदू-मुस्लिमांमधील वांशिक साधर्म्याचा मुद्दाही मांडला.

'हिंदू व मुस्लिम यांचा 'डीएनए' एकच असल्याचं आधुनिक विज्ञानानं सिद्ध केलं आहे. याचाच अर्थ मुस्लिमांचे पूर्वज हे मूळचे हिंदूच होते. हे स्वीकारण्यात मुस्लिमांना काय अडचण आहे? खासगीत काही मुस्लिम मला भेटतात तेव्हा ते हे मान्य करतात. योगायोगानं माझा जावई (माजी परराष्ट्र सचिव सलमान हैदर यांचा मुलगा) मुस्लिम आहे. त्याचे पूर्वज हिंदू होते हे तो मान्य करतो. त्याचं कुटुंबही तेच म्हणतं. तसंच फारुख अब्दुल्लाही ते मान्य करू शकतात,' असं स्वामी म्हणाले.

'आम्ही पूर्वी हिंदू होतो हे मुस्लिमांनी जाहीरपणे मान्य करायला हवं. तसं झाल्यास सर्व भारतीयांमध्ये एकतेची भावना निर्माण होईल. मुस्लिम हे परकीय किंवा घुसखोर आहेत असं कुणीच मानणार नाही. तसंच हिंदूंचा मुस्लिमांबद्दल दृष्टिकोन बदलून जाईल,' असा दावाही स्वामी यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज