अ‍ॅपशहर

नाना पाटेकरांकडून नोटाबंदीचं 'गोड'कौतुक

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय बॉलिवूडमध्ये 'ब्लॉकबस्टर' ठरला असतानाच, आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही नोटाबंदीचं स्वागत केलं आहे. हा निर्णय म्हणजे देशातील प्रामाणिक नागरिकांसाठी गोड चहाच आहे, असं प्रशस्तिपत्र नानाने दिलंय.

Maharashtra Times 16 Nov 2016, 2:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nana patekar praises pm modi for demonetization
नाना पाटेकरांकडून नोटाबंदीचं 'गोड'कौतुक


पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय बॉलिवूडमध्ये 'ब्लॉकबस्टर' ठरला असतानाच, आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही नोटाबंदीचं स्वागत केलं आहे.

मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे देशातील प्रामाणिक नागरिकांसाठी गोड चहाच आहे, यापेक्षा उत्तम निर्णय असूच शकत नाही, असं प्रशस्तिपत्र नानाने दिलंय. जम्मूतील कठुआ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची भेट घेतल्यानंतर त्यानं ही प्रतिक्रिया दिली.

काळ्या पैशाविरोधातील मोहीम तीव्र करण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला जाहीर केला होता. त्यानंतर, बिग बी अमिताभ बच्चन, खान त्रिकूट, रजनीकांत, करण जोहर, ऋषी कपूर, कपिल शर्मा, अजय देवगण, दीपिका पदुकोण, करीना कपूर, अनुराग कश्यप यांसारख्या अनेक तारे-तारकांसह बॉलिवूडच्या सर्वच सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाद दिली होती. ही यादी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यात आज नाना पाटेकर हे नाव जोडलं गेलं.

सामाजिक आणि राजकीय विषयावर परखड, रोखठोक मतं मांडणारा सजग, संवेदनशील अभिनेता म्हणून नाना ओळखला जातो. मोदींचा 'कडक चहा' हा प्रामाणिक जनतेसाठी गोड चहाच आहे, अशा शब्दांत त्यानं मोदींच्या नोटाबंदीच्या धाडसी निर्णयावर पसंतीची मोहोर उमटवली आहे. स्वाभाविकच, त्यानं केलेलं हे 'गोड'कौतुक मोदी सरकारसाठी मोठी शाबासकीच आहे. 'माझा निर्णय कडक चहासारखा आहे आणि गरिबांना कडक चहाच आवडतो', असं समर्थन पंतप्रधान मोदींनी अलीकडेच केलं होतं.



दरम्यान, देशाची सर्वात मोठी ताकद शस्त्रास्त्रं नसून सीमेवरील जवान ही आहे. देशाची एकता आणि अखंडतेसाठी सीमांचं रक्षण करणारे जवान हे खरे हिरो आहेत, अशा भावना व्यक्त करत नानानं बीएसएफ जवानांना सलाम केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज