अ‍ॅपशहर

'RSSने गांधींची हत्या केली असं म्हणालोच नव्हतो!'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही व्यक्तींनी महात्मा गांधींची हत्या केल्याचाच आरोप मी केला होता, संपूर्ण संघालाच गांधीहत्येसाठी कधीच जबाबदार धरलं नव्हतं, असं स्पष्टीकरण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वतीने आज सुप्रीम कोर्टात देण्यात आलं.

Maharashtra Times 24 Aug 2016, 5:16 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम never blamed rss for gandhis killing rahul tells supreme court
'RSSने गांधींची हत्या केली असं म्हणालोच नव्हतो!'


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही व्यक्तींनी महात्मा गांधींची हत्या केल्याचाच आरोप मी केला होता, संपूर्ण संघाला गांधीहत्येसाठी कधीच जबाबदार धरलं नव्हतं, असं स्पष्टीकरण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वतीने आज सुप्रीम कोर्टात देण्यात आलं. मुंबई हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत, वकील कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींची बाजू मांडली.

‘महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेने केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हत्या केली या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही संघटनेला दोषी ठरवू शकत नाही. तुम्ही संघाची माफी मागा अथवा खटल्याला सामोरे जा,’ अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात राहुल गांधींना फटकारलं होतं. त्यावर, राहुल गांधी माफी मागणार नाहीत आणि आम्ही कोर्टाकडे पुन्हा आमचे म्हणणे मांडू, अशी भूमिका काँग्रेसने जाहीर केली होती. त्यानुसार, राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गांधीहत्येचा थेट ठपका ठेवलाच नव्हता, याकडे कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधलं. त्यांनी संघाशी संबंधित व्यक्तीवर आरोप केलेत, संघाची बदनामी केलेली नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

हा खुलासा सुप्रीम कोर्टाला पटला असून, राहुल यांच्या या स्पष्टीकरणाने याचिकाकर्त्यांचेही समाधान होत असल्यास बदनामीचा खटला मागे घ्यावा, असं कोर्टाने सूचित केलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १ सप्टेंबरला होईल. त्यावेळी संघ काय पवित्रा घेतो, यावर या खटल्याचं भवितव्य ठरणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात भिवंडी येथील जाहीर सभेत बोलताना ‘संघाने महात्मा गांधी यांची हत्या केली,’ असा आरोप केला होता. या आरोपामुळे संघाची बदनामी झाल्याने भिवंडीतील कोर्टात फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. त्यावर राहुल गांधींनी हायकोर्टातही धाव घेतली होती. मात्र, तेथेही विरोधात निकाल गेल्याने राहुल गांधी यांनी मे महिन्यात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांनाच दणका दिला होता.

‘राहुल गांधी यांनी केलेले आरोप सरकारी नोंदीवरून आणि पंजाब व हरियाणा हायकोर्टाच्या निकालावरून केले आहेत. त्यांनी संघाचे थेट नाव घेतलेले नाही’, असा युक्तिवाद त्यांचे वकील हरिन रावळ यांनी केला होता. परंतु, न्या. दीपक मिश्रा आणि आर. एफ. नरिमन यांनी तो फेटाळला होता. एका संघटनेची अशा प्रकारे बदनामी करणारी प्रक्षोभक भाषा तुम्हाला वापरता येणार नाही. राहुल गांधी यांनी रा. स्व. संघाची माफी मागावी किंवा खटल्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे न्यायालयाने सुनावले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज