अ‍ॅपशहर

ओडिशामध्ये तीन ट्रेन्सच्या अपघातात २८८ जणांचा मृत्यू; आठवड्याभरानंतर रेल्वेचा मोठा निर्णय

odisha train accident: ओडिशाच्या बालासोरमध्ये २८८ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताला आठवडा उलटल्यानंतर आता रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तपासाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jun 2023, 5:33 pm
भुवनेश्वर: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन ट्रेन्सचा भीषण अपघात झाला. २ जूनच्या संध्याकाळी झालेल्या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला, तर हजारपेक्षा अधिक जण जखमी झाले. कोरोमंडल एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या भीषण अपघातानं संपूर्ण देश हादरला. या अपघाताचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. सिग्नल यंत्रणेत करण्यात आलेल्या छेडछाडीमुळे अपघात झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम odisha train


बालासोर जिल्ह्यातील बाहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ तीन ट्रेन्सचा अपघात झाला. या रेल्वे स्थानकात आता कोणतीही ट्रेन थांबणार नाही. अपघाताचा तपास करणाऱ्या सीबीआयनं लॉग बुक, रिले पॅनल आणि उपकरणं जप्त करुन स्टेशन सील केलं आहे. त्यामुळे आता कोणतीही ट्रेन बाहानगा बाजार स्थानकात थांबणार नाही. रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती शनिवारी दिली.
ओडिशातील अपघातस्थळी कुजकट वास, स्थानिक बेजार; तपासासाठी टीम पोहोचली, काय सापडलं?
२ जूनच्या संध्याकाळी बाहानगा रेल्वे स्थानकाजवळ तीन ट्रेन्सचा अपघात झाला. यानंतर कित्येक तास रेल्वेकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते. रेल्वे रुळांची दुरुस्ती, त्यावर पडलेले डबे हटवण्यात आल्यानंतर अप आणि डाऊन मार्गावरुन सात ट्रेन रवाना झाल्या. त्या बाहानगा रेल्वे स्थानकात थांबल्या. यातील बहुतांश ट्रेन लोकल होत्या.
माझं कुंकू गेलं! मृतदेहाजवळ बसून महिला धाय मोकलून रडली; पोलिसाला शंका; धक्कादायक प्रकार उघड
सीबीआयनं रेल्वे स्थानकातील लॉग बुक, रिले पॅनल आणि अन्य उपकरणं जप्त करुन पूर्ण स्थानक सील केल्याची माहिती आग्नेय रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्य कुमार चौधरी यांनी दिली. 'रिले इंटरलॉकिंग पॅनलच्या सिग्नलिंग यंत्रणेपर्यंत कोणताही कर्मचारी पोहोचू नये यासाठी बाहानगा रेल्वे स्थानक सील करण्यात आलं आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत कोणताही प्रवासी ट्रेन किंवा मालगाडी या स्थानकात थांबणार नाही,' असं चौधरी यांनी सांगितलं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख