अ‍ॅपशहर

काश्मीरविषयक बैठकीवर अब्दुल्लांचा निशाणा

जम्मू-काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. 'जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना का सहभागी करून घेतलं नाही,' असा सवाल ओमर यांनी केला आहे.

Maharashtra Times 12 Jul 2016, 12:59 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम omar abdullah takes swipe at mehboobas absence from meet chaired by pm
काश्मीरविषयक बैठकीवर अब्दुल्लांचा निशाणा

जम्मू-काश्मीरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. 'जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना का सहभागी करून घेतलं नाही,' असा सवाल ओमर यांनी केला आहे.

दहशतवादी बुरहान वानी मारला गेल्यानंतर काश्मिरात फुटिरतावाद्यांनी हिंसक निदर्शनं सुरू केली असून त्यात आतापर्यंत ३० लोकांचा बळी गेला आहे. चार दिवसांनंतरही ही निदर्शनं सुरूच असून परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. काश्मिरातील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज परदेश दौऱ्यांवरून परतताच उच्चस्तरीय बैठक बोलावली. गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे बैठकीला उपस्थित होते. काश्मीरमधील वातावरण निवळण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश यावेळी पंतप्रधानांनी संबंधितांना दिले. तसंच, काश्मीरमधील जनतेनं शांतता राखावी, असं आवाहनही मोदी यांनी केल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बैठकीनंतर सांगितलं.

ओमर अब्दुल्ला यांनी मात्र मोदींनी बोलावलेल्या या बैठकीवर ट्विटरद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'राज्यात तणावपूर्ण परिस्थिती असताना मुख्यमंत्री मेहबुबा यांचं राज्यात थांबणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्यांनी दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला नसावा. पण, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना बैठकीत सहभागी करून घेता आलं असतं. एरवी क्षुल्लक कामांसाठी आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतो. मग जिथं मेहबुबा यांची उपस्थिती गरजेची आहे, तिथं असं का केलं गेलं नाही,' असा सवाल ओमर यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज