अ‍ॅपशहर

मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आज १३ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन सध्या देशात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाल्याचं त्यांना सांगितलं. ईव्हीएम, अलवर घटना आणि तपास संस्थांचा गैरवापर याबाबतही विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली.

Maharashtra Times 12 Apr 2017, 6:43 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम opposition approaches president pranab mukherjee alleges voices of dissent being muzzled
मोदी सरकारविरोधात विरोधक राष्ट्रपतींकडे


काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आज १३ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन सध्या देशात भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाल्याचं त्यांना सांगितलं. ईव्हीएम, अलवर घटना आणि तपास संस्थांचा गैरवापर याबाबतही विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली. केंद्रातील मोदी सरकार स्वत:ला हवं तेच करत आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी तातडीने हस्तक्षेप करून ही मनमानी रोखावी. हे कायद्याचं राज्य आहे, असा विश्वास लोकांना द्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. दरम्यान, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावले. हाती कोणताही मुद्दा नसल्यानेच विरोधक अपप्रचार करत आहेत, असे नायडू म्हणाले.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, डी. राजा, सतीश मिश्रा, अहमद पटेल, ए. के. अँटनी अशा प्रमुख नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

राष्ट्रपतींच्या भेटीनंतर गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना माहिती दिली. देशात आज भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. राजस्थान, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. याकडे राष्ट्रपतींचं लक्ष्य वेधण्यात आलं आहे, असे आझाद म्हणाले.

ईव्हीएममध्ये फेरफार केला जात असल्याच्या ताज्या आरोपांनी देशातील निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे. राज्यसभेचे घटनात्मक अधिकार 'बायपास' करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही बाबही राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे आझाद यांनी नमूद केले.

देशातील लोकशाही संपली आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये ज्याप्रकारे सत्तास्थापन करण्यात आली ते याचे ताजे उदाहरण आहे, असेही आझाद म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज