अ‍ॅपशहर

प्रादेशिक पक्षांचं राजकारण जातीवर आधारित, ते भाजपशी लढू शकत नाहीत : राहुल गांधी

महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यांत प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसची आघाडी असताना पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 May 2022, 7:05 am
उदयपूर : राजस्थानातील उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराची रविवारी सांगता झाली. यावेळी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi Speech) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रादेशिक पक्षांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'प्रादेशिक पक्षांचं राजकारण हे जातीवर आधारित आहे. या पक्षांकडे विचारधारा नसल्यामुळे ते कधीही भाजपशी लढू शकत नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केवळ काँग्रेसच टक्कर देऊ शकते,' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यांत प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेसची आघाडी असताना राहुल गांधी यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Congress Rahul Gandhi
काँग्रेस नेते राहुल गांधी


राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या ढासळलेल्या आलेखावरही भाष्य केलं आहे. 'आपला लोकांसोबतचा संवाद तुटला आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. हा संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला लोकांमध्ये मिसळावं लागेल. यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, आपल्याला चांगली मेहनत घ्यावी लागेल,' असं ते म्हणाले.

भाजपला शह; 'एक कुटुंब, एक तिकीट', काँग्रेसच्या शिबिरात २० प्रस्तावांना मंजुरी

'द्वेष आणि हिंसेविरोधात लढा'

नवसंकल्प शिबिरातील भाषणात राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारविरोधातही जोरदार हल्लाबोल केला. 'मी आतापर्यंत कोणाकडून एक रुपयाही घेतलेला नाही, त्यामुळे मी लढताना कोणाला घाबरत नाही. आपला लढा द्वेष आणि हिंसेविरोधात आहे. स्थानिक पातळीपासून काँग्रेसच्या संघटनेत बदल केल्यास आपण हा लढा लढू शकतो,' असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या शिबिरात देशभरातील काँग्रेस नेत्यांमध्ये विचारमंथन झाल्यानंतर काँग्रेसने अनेक प्रस्तावही मंजूर केले आहेत. राहुल गांधी हे आगामी काही महिन्यात देशव्यापी पदयात्रा काढणार असून केंद्र सरकारविरोधात रान पेटवणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा पुनरुज्जीवित करण्यात पक्षनेतृत्वाला यश येतं का, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख