अ‍ॅपशहर

Unnao Rape Case: ...म्हणून काँग्रेसनं काढला मेणबत्ती मोर्चा

कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात आला. या मार्चसाठी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेतेदेखील सहभागी झाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2018, 1:40 pm
नवी दिल्ली:

कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च काढण्यात आला. या मार्चसाठी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मानसिंग रोडपासून इंडिया गेटपर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कठुआ आणि उन्नाव येथे घडलेल्या घटनांबाबत तीव्र दु:ख झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या दोन्ही घटनांच्या निषेध करण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री इंडिया गेटवर शांततापूर्ण कँडल मार्च काढण्यात येईल अशी माहितीदेखील त्यांनी ट्विट करत दिली होती. त्यानंतर मध्यरात्री कँडल मार्च काढण्यात आला.


महिलांविरोधात अत्याचार वाढत असून त्यांच्यासाठी देशात असुरक्षित वातावरण आहे. हा मुद्दा राजकीय नसून राष्ट्रीय समस्या असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. यावर केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत राहुल यांनी व्यक्त केले. याआधी ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी कठुआ बलात्कारप्रकरणी आरोपींचा बचाव करणाऱ्यांवर टीका केली होती. एवढे घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपींचे समर्थन कसे काय होऊ शकते असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.


दरम्यान, कँडल मार्चला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कँडल मार्चला रोखल्यानंतर प्रियंका गांधी यांनी राजपथ मार्गावर कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले. यावेळी गोंधळ निर्माण झाला होता. यावर प्रियंका गांधींनी नाराजी व्यक्त केली.

या कँडल मार्चमध्ये अशोक गेहलोत, कपिल सिब्बल, सलमान खुर्शीद आणि दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद, नफीसा सोनी सारखे काँग्रेसचे दिग्गज नेतेही सहभागी झाले. तसेच निर्भयाचे आईवडीलही या मोर्चात सहभागी झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज