अ‍ॅपशहर

रेल्वे खासगीकरणाच्या रुळावर?; खासगी ट्रेनसेवेसाठी मागवले प्रस्ताव

रेल्वे मंत्रालयाने देशातील १०९ जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. या साठी खासगी क्षेत्राकडून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.ही माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2020, 10:30 am
नवी दिल्ली: केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकणे सुरू केले असून देशातील एकूण १०९ जोडी मार्गांवर खासगी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी रेल्वेने प्रस्ताव मागवले आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात असलेले रेल्वेचे जाळे एकूण १२ क्लस्टरमध्ये विभागले गेले आहे. याच क्लस्टरमध्ये या १०९ जोडी मार्गावर खासगी रेल्वे चालवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम खासगी रेल्वेसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव


ही खासगी रेल्वे कमीतकमी १६ डब्यांची ठेवण्यात येणार आहे. तसेच या गाड्यांचा वेग १६० प्रति किमी इतका ठेवण्यात येणार आहे. या वेगात आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे. या ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनीकडून करण्यात येणार आहे. तसेच खासगी कंपन्यांनाच या सर्व गाड्यांची देखभाल करावी लागणार आहे. तर या सर्व ट्रेनसाठी लागणारे गार्ड आणि मोटरमन मात्र रेल्वेचे असणार आहेत.

या साठी खासगी क्षेत्राकडून ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. केंद्र सरकार हे पाऊल उचलून आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे आणि त्याद्वारे देखभालीचा येणारा मोठा खर्च कमी करणे हा उद्देश साध्य करत आहे. या मुळे ट्रान्झिट टाइमदेखील कमी होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या व्यतिरिक्त यामुळे देशातील बेरोजगारांसाठी नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच या उपक्रमामुळे प्रवाशांना योग्य ती सुरक्षा पुरवून जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणेही शक्य होणार आहे. प्रवासी गाड्या चालण्यासाठी खासगी गुंतवणुकीचा रेल्वेचा हा पहिलाच उपक्रम आहे.


सर्व गाड्या भारतीय बनावटीच्या

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या या प्रस्तावाबाबत ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या निर्मितीचे काम भारतातच होणार आहे. ज्या कंपन्यांना हे काम देण्यात येईल त्या कंपन्यांना वित्तपुरवठ्यापासून ते खरेदी कामकाज आणि देखभालही करावी लागणार आहे.

सवलतही मिळणार

सरकारकडून कंपनीला ३५ वर्षांपर्यंत सवलत देण्यात येणार असून त्याअंतर्गत खासगी कंपनीला रेल्वेला निश्चित रक्कम आणि विजेचे शुल्क द्यावे लागणार आहे. त्यानुसारच एकूण महसुलाची विभागणी करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज