अ‍ॅपशहर

काश्मिरी तरुणांच्या भविष्याशी खेळू नका!

काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्राने 'मिशन काश्मीर' हाती घेतलं असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लवकरच दिवसांत पेलेट गनला पर्याय दिला जाईल, अशी हमी दिली. 'काश्मिरी तरुणांच्या भविष्याशी खेळू नका', असे आवाहनही यावेळी राजनाथ यांनी केले.

Maharashtra Times 25 Aug 2016, 4:22 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajnath singh appeals dont play with future of kashmiri youth
काश्मिरी तरुणांच्या भविष्याशी खेळू नका!


काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्राने 'मिशन काश्मीर' हाती घेतलं असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लवकरच दिवसांत पेलेट गनला पर्याय दिला जाईल, अशी हमी दिली तर ज्यांना गोळ्या वा पेलेट लागल्या ते दूध किवां टॉफी घ्यायला घराबाहेर पडले नव्हते, अशा शब्दांत फटकारत मेहबूबा यांनी सुरक्षादलांनी निदर्शकांविरोधात केलेल्या कारवाईचं समर्थन केलं.

पेलेट गनबाबत तज्ज्ञ समितीचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसात येईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत आम्ही पेलेट गनला पर्याय देऊ. आम्ही सुरक्षादलालाही जेवढा संयम राखता येईल तेवढा राखा, अशा सूचना दिल्या आहेत, असे राजनाथ यांनी स्पष्ट केले.

काश्मीर हिंसाचारादरम्यान मी दुसऱ्यांदा येथे आलो आहे. २० पेक्षा जास्त शिष्टमंडळांशी मी चर्चा केली आहे. काश्मिरात शांतता नांदावी असे सर्वांनाच वाटत आहे. कालही जवळपास ३०० लोक मला भेटले. काश्मीरमध्ये सध्या जी स्थिती आहे त्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्याकडे मी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. काश्मीमधील युवा पिढीच्या भविष्याचा विचार करा. त्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा होऊ देऊ नका. त्यांच्या हातात दगड नाही तर लेखणी आणि कॉम्प्युटर असायला हवा, अशी विनंतीही मी त्यांना केल्याचे राजनाथ यांनी नमूद केले. भारताचं उज्ज्वल भविष्य पाहात असताना काश्मीरच्या भविष्याचा विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे हिंसाचाराकडे वळणाऱ्या तरुणांची समजूत घातली गेली पाहिजे, असे आवाहन राजनाथ यांनी केले.

हुर्रियतच्या नेत्याशी चर्चा करण्याबाबत विचारले असता काश्मीरच्या हिताशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. त्या चौकटीत राहून कुणाशीही चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असे राजनाथ यांनी स्पष्ट केले.

९५ टक्के लोकांना हवीय शांतता

काश्मीरमधील ९५ टक्के लोकांना शांतता हवी आहे. त्यामुळे जे ५ टक्के लोक हिंसाचार घडवत आहेत त्यांची कोणत्याही स्थितीत गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे यावेळी मेहबूबा यांनी ठणकावले. २०१० मध्ये काश्मीरमध्ये उसळलेल्या हिंसाचारावेळी तेव्हाच्या सरकारविरोधात मेहबूबा यांनी जोरदार मोहीम उघडली होती. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता मेहबूबा संतापल्या. तेव्हाची आणि आताची परिस्थिती वेगळी आहे, असे उत्तर त्यांनी दिले. दगडफेक आणि हल्ले करून काश्मीरची समस्या सुटणार नाही. चर्चेतूनच हा प्रश्न सुटेल असं माझं स्पष्ट मत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. काश्मीरला आम्ही नरक होऊ देणार नाही, असेही यांनी यावेळी ठणकावले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज