अ‍ॅपशहर

बँकेत जमा झालेले ४ लाख कोटी संशयास्पद

नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेले ४ लाख कोटी रुपये संशयाच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे. ज्या बँक खात्यांमध्ये अघोषित उत्पन्न जमा करण्यात आले आहे, त्यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले. तसेच खात्यांमध्ये जमा झालेल्या पैशांचा स्त्रोत जाहीर न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

Maharashtra Times 30 Dec 2016, 12:17 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rs 4 lakh crore of cash deposits so far may be suspect estimates i t
बँकेत जमा झालेले ४ लाख कोटी संशयास्पद


नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेले ४ लाख कोटी रुपये संशयाच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे. ज्या बँक खात्यांमध्ये अघोषित उत्पन्न जमा करण्यात आले आहे, त्यांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले. तसेच खात्यांमध्ये जमा झालेल्या पैशांचा स्त्रोत जाहीर न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

नोटाबंदीनंतर अनेकांनी काळ्याचे पांढरे करण्यासाठी बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले. पण या जमा झालेल्या रकमेवर आयकर विभागाचे लक्ष आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबरपर्यंत १.१४ लाख बँक खात्यांमध्ये ४ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. या रकमेतील मोठा भाग हा अशा लोकांचा असण्याची शक्यता आहे, ज्यांनी काळ्याचे पांढरे केले आहे. या साऱ्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आयकर विभागाकडून संबंधित खातेधारकांचे इन्कम टॅक्स रिटर्न मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नियमानुसार, टॅक्स भरणाऱ्यांना स्वत:जवळ मोठ्या प्रमाणात रोकड बाळगता येत नाही. बँकांमध्ये मोठी रक्कम जमा करणाऱ्या पाच हजार जणांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. प्रत्येक आठवड्याला मिळणाऱ्या माहितीनुसार अघोषित उत्पन्न जमा करणाऱ्यावर कारवाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

६० लाख खातेदारांनी जमा केले ७ लाख कोटी!

नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील ६० लाख व्यक्ती आणि संस्थांनी बँकांमध्ये सात लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या ३० ते ४० हजार जनधन खात्यांमध्ये जमा झालेल्या रक्कमेची देखील चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१.७७ लाख जणांनी २५ लाखांहून अधिक कर्ज फेडले!

देशातील १ लाख ७७ हजार जणांनी १० नोव्हेंबरपर्यंत कर्जाची २५ लाख रुपयांहून अधिक रक्कम भरली आहे. ही सर्व रक्कम जुन्या नोटांच्या स्वरूपातच भरण्यात आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. या यादीत काही कंपन्या आणि संस्थांचाही समावेश आहे. ज्यांनी रोख स्वरूपात कर्जाचे मोठे हप्ते भरले आहेत त्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच केवायसी पूर्ण नसलेल्या ज्या बँक खात्यांमध्ये १ कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे त्यांची देखील चौकशी होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज