अ‍ॅपशहर

समाजवादी पक्षात फूट

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर समाजवादी पक्षामध्ये अटळ दिसत असलेल्या फुटीला अखेर शुक्रवारचा ‘मुहूर्त’ मिळाला.

Maharashtra Times 6 May 2017, 5:14 am
शिवपाल यांच्या नव्या पक्षाचे मुलायमसिंह अध्यक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम samajwadi party splits shivpal yadav forms new party
समाजवादी पक्षात फूट


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर समाजवादी पक्षामध्ये अटळ दिसत असलेल्या फुटीला अखेर शुक्रवारचा ‘मुहूर्त’ मिळाला. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी शुक्रवारी नव्या पक्षाची घोषणा केली असून, नेताजी मुलायमसिंह यादव यांना पक्षाचे अध्यक्षपद बहाल केले आहे. समाजवादी सेक्युलर मोर्चा असे या नव्या पक्षाचे नाव आहे.

मुलायमसिंह यांनी १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. मागील वर्षभर अखिलेश व मुलायम यांच्यामध्ये सुरू असलेल्या धुसफुशीमुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर येऊन उभा होता. वडील-मुलाच्या संघर्षासाठी कारणीभूत ठरलेले शिवपाल यांची अखिलेश यांनी पक्षातून हकालपट्टीही केली होती. मात्र, निवडणूक तोंडावर आल्याने समाजवादी पक्षाला अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकत्र लढावे लागले होते. अखेर निवडणुकीतील पराभवामुळे पक्षातील फुटीचा मार्ग मोकळा झाला.

नेताजींना त्यांचा सन्मान पुन्हा मिळवून देण्याबरोबरच समाजवाद्यांना एकत्र आणण्यासाठी नवा पक्ष लवकरच कार्यक्रम आखेल, असे शिवपाल यांनी शुक्रवारी सांगितले. एटावा येथे मेहुणे अजंत सिंह यादव यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर नव्या पक्षाची घोषणा करण्यात आली. तथापि, मुलायमसिंह यांनी अद्याप नव्या पक्षाबाबत आपली प्रतिक्रिया जाहीर केलेली नाही. शिवपाल यांनी या आठवड्याच्या सुरुवातीस अखिलेश यांना समाजवादी पक्षाची सर्व सूत्रे मुलायमसिंह यांच्याकडे सोपवण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. २०१२ ते २०१७ या काळात सत्तेवर असलेल्या समाजवादी पक्षाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ ४७ जागांवर समाधान मानावे लागले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज