अ‍ॅपशहर

प्रद्युम्न हत्या: SC ची केंद्र, राज्य, CBI ला नोटीस

गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल शाळेतल्या प्रद्युम्न हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा मनुष्यबळ विकास विभाग, हरयाणा सरकार, सीबीआय आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. कोर्टाने या सर्व पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत दिली आहे. प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांनी प्रद्युम्नच्या हत्येसंदर्भात आज याचिका दाखल केली. त्यावरची तातडीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घेतली.

Maharashtra Times 11 Sep 2017, 3:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sc issued notice to centre hrd ministry cbi cbse haryana govt
प्रद्युम्न हत्या: SC ची केंद्र, राज्य, CBI ला नोटीस


गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल शाळेतल्या प्रद्युम्न ठाकूर या ७ वर्षीय मुलाच्या हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा मनुष्यबळ विकास विभाग, हरयाणा सरकार, सीबीआय आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. कोर्टाने या सर्व पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत दिली आहे. प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांनी प्रद्युम्नच्या हत्येसंदर्भात आज याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेतली.

वरुण ठाकूर यांनी सांगितले, 'माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायालयाने जी कार्यवाही केली त्यावर मी समाधानी आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मला फोन केला होता. हरयाणा सरकारकडूनही आम्हाला पाठिंबा मिळत आहे.' वरुण ठाकूर यांच्या वकिलांनी सांगितल्यानुसार, ही नोटीस केवळ एका शाळेपुरती मर्यादित नाही. देशातल्या सर्व शाळांना ती लागू होते. शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची याचिका वरुण ठाकूर यांनी याचिकेत केली आहे. यासह प्रद्युम्नच्या हत्येची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे सोपवावा, अशी मागणीही ठाकूर यांनी केली आहे.

न्या दीपक मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचा खंडपीठात समावेश होता. गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात ८ सप्टेंबर रोजी प्रद्युम्नचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. हत्येच्याच दिवशी स्कूल बस कंडक्टर अशोक कुमार याला प्रद्युम्नचा लैंगिक छळ करून हत्या केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. पण प्रद्युम्नच्या आईचे म्हणणे आहे की प्रद्युम्नने शाळेत असे काहीतरी घडताना पाहिले आहे, जे पुढे येऊ नये म्हणून त्याला ठार करण्यात आले. खऱ्या दोषींना अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा प्रद्युम्नच्या आईने दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज