अ‍ॅपशहर

७ वर्षीय मुलाने बिबट्याला पिटाळले!

एका ७ वर्षीय मुलाने मोठं धाडस दाखवत आपल्या समवयस्क मित्राला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवले आहे. झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या मुलावर झडप घातली. त्याला जबड्यात पकडून तो जंगलाच्या दिशेने पळत होता मात्र त्याच क्षणी शक्कल लढवून या धाडसी चिमुकल्याने आपल्या मित्राचे प्राण वाचवले.

Maharashtra Times 28 Sep 2017, 4:31 am
मटा ऑनलाइन वृत्त । राजकोट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम seven year old boy saves friend from leopard jaws in rajkot
७ वर्षीय मुलाने बिबट्याला पिटाळले!


एका ७ वर्षीय मुलाने मोठं धाडस दाखवत आपल्या समवयस्क मित्राला बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवले आहे. झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या मुलावर झडप घातली. त्याला जबड्यात पकडून तो जंगलाच्या दिशेने पळत होता मात्र त्याच क्षणी शक्कल लढवून या धाडसी चिमुकल्याने आपल्या मित्राचे प्राण वाचवले.

गीर सोमनाथमधील कोडीनार तालुक्यातील अराथिया गावात ही घटना घडली. जयराज गोहेल असे या धाडसी चिमुकल्याचे नाव आहे. जयराज त्याचा मित्र नीलेशसह घराजवळच खेळत होता. इतक्यात जवळच्या झुडपांत दबा धरून बसलेल्या बिबट्याने नीलेशवर झडप घातली आणि त्याला फरफटत जंगलाच्या दिशेने नेण्याच्या प्रयत्नात बिबट्या होता. या प्रकाराने जराही न घाबरता जयराज तिथेच उभा राहिला. आपल्या मित्राला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याने आधी दगड भिरकावला. मात्र, त्याचा काहीच उपयोग न झाल्याने त्याने त्याच्याकडील इलेक्ट्रॉनिक खेळणे बिबट्याच्या दिशेने फेकले.



हे खेळणे बिबट्याच्या जवळ जाऊन पडले आणि त्यातून कर्कश आवाज येऊ लागला. या आवाजाला घाबरून बिबट्याने नीलेशला जबड्यातून खाली फेकत धूम ठोकली, अशी माहिती जमवाडा वनविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.



जयराज अराथिया प्राथमिक शाळेत शिकतो. या शाळेचे मुख्याध्यापक प्रताप राठोड यांनी जयराजच्या धाडसाचे कौतुक केले. जयराजने प्रसंगावधान दाखवल्यामुळेच नीलेशचे प्राण वाचले असे ते म्हणाले. याबाबत गावच्या सरपंचानी वनविभागाला माहिती दिली असून वनविभागाकडून जयराजचा लवकरच सत्कार केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, गीर-सोमनाथ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांची मुक्तसंचार असून गावकरी बिबट्यांच्या दहशतीखाली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज