अ‍ॅपशहर

अविश्वास ठरावावेळी शिवसेना तटस्थ राहणार

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात वायएसआर काँग्रेसकडून आज संसदेत अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. या अविश्वास ठरावाला काँग्रेस, डावे, समाजवादी पार्टी, एआयएडीएमके आणि एआयएमआयएमने पाठिंबा दिला आहे. परंतु चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने आमच्याकडून बंडाची प्रेरणा घेतल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेने मात्र अविश्वास ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2018, 12:32 pm
नवी दिल्ली: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात वायएसआर काँग्रेसकडून आज संसदेत अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. या अविश्वास ठरावाला काँग्रेस, डावे, समाजवादी पार्टी, एआयएडीएमके आणि एआयएमआयएमने पाठिंबा दिला आहे. परंतु चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने आमच्याकडून बंडाची प्रेरणा घेतल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेने मात्र अविश्वास ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sena will not support no confidence motion in lok sabha
अविश्वास ठरावावेळी शिवसेना तटस्थ राहणार


अविश्वास ठराव मांडण्यासाठी किमान ५० सदस्यांचं पाठबळ हवं. वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीच्या या अविश्वास ठरावाला काँग्रेससह डावे, समाजवादी पार्टी, एआयएडीएमके आणि एआयएमआयएमने पाठिंबा दिल्याने अविश्वास ठराव मांडण्यासाठी लागणारी मतांची बेगमी करण्यात वायएसआर काँग्रेस आणि टीडीपी यशस्वी ठरले आहेत. मात्र अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी लागणारं पुरेसं संख्याबळ विरोधकांकडे नसल्याने हा अविश्वास ठराव नामंजूर होण्याची शक्यता असली तरी अविश्वास ठरावाच्या निमित्ताने विरोधक एकत्र आल्याने मोदी सरकारचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारला वारंवार धारेवर धरणाऱ्या शिवसेनेने अविश्वास ठरावाच्यावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असून टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर तृणमूल काँग्रेसही या अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून दुपारीच त्याबाबतचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. लोकसभेत काँग्रेसचे ४८, एआयएडीएमकेचे ३७, टीडीपीचे १६, वायएसआर काँग्रेस आणि सीपीएमचे प्रत्येकी ९ आणि एमआयएमआयएमचा एक खासदार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज