अ‍ॅपशहर

कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून मुंबई जिंकू; राज-गडकरी भेटीवर राऊतांचा घणाघात

राज्यात होऊ घातलेल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Apr 2022, 10:21 am
नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने भाजप-मनसे युतीची चर्चा रंगू लागली आहे. मात्र या भेटीचा संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. 'अशा भेटीगाठी होत असतात, आम्हीही अनेक लोकांना भेटतो, अनेक लोक येऊन आम्हाला भेटतात. प्रत्येक भेटीमागे राजकारण असतं असं काही नाही आणि आम्ही त्याच्यावर बोलण्याची गरज नाही. भाजप-मनसे युतीवर फार काही बोलावं अशी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात स्थिती नाही. रात गयी.. बात गयी,' अशा शब्दांत संजय राऊत यांनी दोन्ही नेत्यांच्या भेटीवर टीकास्त्र सोडलं आहे. (Sanjay Raut On Raj Thackeray)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut on mns
संजय राऊत


मनसे-भाजप युतीची शक्यता आणि राज्यात होऊ घातलेल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 'मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, कल्याण-डोंबिवलीसह सर्व महानगरपालिका आम्ही ताकदीने लढू आणि जिंकू. मुंबई महानगरपालिकेतही शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरी कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही मुंबई महापालिका जिंकणार, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. या षडयंत्रांचा काहीही फरक पडणार नाही,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Mohit Kamboj: सलीम गया अब जावेद जाएगा! मोहित कंबोज यांच्याकडून संजय राऊतांवर कारवाईचे संकेत

'गोव्यातील दोन मतदारसंघातील नागरिकांच्या मागेही ईडी लावा'

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ईडीबाबतच्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊत यांनी भाजपवर खरपूस टीका केली आहे. 'कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील काही लोकांच्या मागे ईडीची चौकशी लावण्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. माझी त्यांना विनंती आहे की त्याआधी गोव्यातील उत्पल पर्रिकर यांचा पराभव झालेल्या पणजी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे विजयी झालेल्या सांखळी मतदारसंघातील नागरिकांच्या मागेही ईडीची चौकशी लावा. त्यांना भरपूर आमिष दाखवून तिथून भाजपने विजय मिळवला आहे' असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केलं आहे. 'शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत, आम्ही सर्वच त्यांचा आदर आणि सन्मान करतो. देशातील विरोधी पक्षांना एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र यावेत, यासाठी हालचाली सुरू आहेत आणि शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय या एकजुटीचं पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सर्वांना माहीत आहे. पवार यांचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभत असतं. शरद पवार यांच्या प्रयत्नशिवाय मोदींना पर्याय आणि सक्षम विरोधी पक्ष तयार होऊ शकत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज