अ‍ॅपशहर

विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही: सर्वोच्च न्यायालय

विवाहबाह्य संबंधात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुरुष आणि स्त्री दोन्ही समान आहेत. त्यामुळे विवाहबाह्य संबंधात पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असं सांगतानाच विवाहबाह्य संबंध (व्यभिचार) हा गुन्हा नाही. हा अपराध होऊ शकत नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. व्याभिचाराला गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम ४९७ ही कोर्टाने अवैध ठरवलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2018, 2:33 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम love-triangle


विवाहबाह्य संबंधात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुरुष आणि स्त्री दोन्ही समान आहेत. त्यामुळे विवाहबाह्य संबंधात पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असं सांगतानाच विवाहबाह्य संबंध (व्यभिचार) हा गुन्हा नाही. हा अपराध होऊ शकत नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. व्याभिचाराला गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम ४९७ ही कोर्टाने अवैध ठरवलं आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश एम. खानविलकर, आर. एफ. नरीमन, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा आदी पाच सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जोसेफ शाइन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विवाहबाह्य संबंधासंदर्भातील या कायद्याला आव्हान दिलं होतं. महिलांना असमानतेची वागणूक देणं हे असंविधानिक आहे. मी, तू आणि आम्ही हे लोकशाहीचं वैशिष्ट्ये आहे, असं दीपक मिश्रा यांनी सांगितलं. भारतीय दंड संहितेचं कलम ४९७ महिलेच्या सन्मानाच्या विरोधात आहे. महिलांचा नेहमीच सन्मान करायला हवा, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

समाजाच्या इच्छेनुसार महिलांना विचार करण्यास सांगता येऊ शकत नाही. संसदेनेही महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कौटुंबीक हिंसाचाराविरोधी कायदा मंजूर केला आहे. त्यामुळे पती कधीही पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

घटस्फोट होऊ शकतो

व्यभिचार हा गुन्हा नसला तरी विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने स्त्री किंवा पुरुष दोघांनाही घटस्फोट घेता येऊ शकतो, असं मिश्रा यांनी स्पष्ट केलं.

स्त्रियांची मानहानी करणारा कायदा

हा कायदा मनमानी करणारा असल्याचं चंद्रचूड यांनी सांगितलं. हा कायदा स्त्रियांची मानहानी करणारा आहे. हा कायदा लैंगिक पसंती रोखणारा आहे. त्यामुळेच तो असंविधानिक आहे. लग्नानंतरही स्त्रियांना लैंगिक पसंतीपासून रोखता येणार नाही, असंही चंद्रचूड यांनी सांगितलं.

... तर आत्महत्येचा गुन्हा दाखल होणार

व्यभिचार हा गुन्हा नाही. मात्र या कारणाने जर तुमच्या पार्टनरने आत्महत्या केली तर त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

सरकार काय म्हणाले होते...

भादंविचं ४९७ कलमाला गुन्हा न ठरविल्यास विवाह संस्थांमध्ये वादळ निर्माण होईल, असा तर्क केंद्र सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वर्तवला होता. अॅडल्ट्रीला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढल्यास विवाहाचं पावित्र्य संपुष्टात येईल आणि त्यामुळे समाजात तणाव निर्माण होईल. तसंच विवाह संस्थांमध्ये वादळं येतील, असं केंद्रानं प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. ४९७ कलमांमुळे देशातील लग्नसंस्था टिकून आहेत, हे कलम नसेल तर लग्नसंस्था कमकुवत होतील, असेही केंद्र सरकारने म्हटले होते.

विवाहबाह्य संबंध (व्याभिचार) कायदा काय आहे...

>> हा कायदा १५८ वर्ष जुना आहे.

>> आयपीसीच्या कलम ४९७ नुसार अवैध संबंध ठेवल्यास ५ वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.

>> या कायद्यानुसार केवळ महिलेच्या पतीने गुन्हा दाखल केला तरच गुन्हा नोंद होतो. तिचा मुलगा, मुलगी किंवा इतर नातेवाईक गुन्हा नोंद करू शकत नाहीत. त्यामुळे या कायद्यातून पत्नी ही पतीची खाजगी मालमत्ता असल्याचंच अधोरेखित होतो.

>> पतीने दुसऱ्या महिलेसोबत शरीर संबंध ठेवले तर त्या पुरुषाची पत्नी पती किंवा संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करू शकत नाही. तशी या कायद्यात तरतूद नाही. परंतु पतीने व्याभिचार केल्याच्या आरोपावरून ती घटस्फोट घेऊ शकते, मात्र तक्रार नोंदवू शकत नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज