अ‍ॅपशहर

तरुणांची फसवणूक सुरू

मोदी-शहांवर राहुल गांधी यांचा आरोपवृत्तसंस्था, नवी दिल्ली'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशातील तरुणांचे भविष्य ...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2019, 4:00 am

मोदी-शहांवर राहुल गांधी यांचा आरोप

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करीत आहेत. तिरस्काराच्या आडून तरुणांची फसवणूक सुरू आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाहीत. भारतीयांना केवळ प्रेमानेच पराभूत करता येते,' अशी टीका कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत आयोजित एका रॅलीत बोलताना केली. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून ही मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 'सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्याविषयी खोटी माहिती देऊन गरीब आणि अल्पसंख्याकांना चिथावणी दिली जात आहे. माझ्या प्रिय भारतीय तरुणांनो, मोदी आणि शहा तुमचे भविष्य उद्ध्वस्त करीत आहेत. अर्थव्यवस्था कोसळल्यामुळे आणि तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे तरुणांमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे, त्यातून मोदी-शहा मार्ग काढू शकत नाहीत. त्यामुळेच ते देशात मतभेद आणि परस्पर द्वेष पसरवित आहेत. ते आपल्या प्रिय भारताला विभाजित करीत आहेत,' असे ट्विट त्यांनी केले आहे.

प्रियांकांकडून सांत्वन

बिजनोर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रविवारी नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात मृत्यू झालेल्या नाहतौर येथील दोन आंदोलकांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी या परिसरातील नागरिकांसोबतही संवाद साधल्याचे उत्तर प्रदेश अध्यक्ष काँग्रेस अजय कुमार लल्लू यांनी सांगितले. बिजनोर हा 'नागरिकत्व'वरून झालेल्या हिंसाचाराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांपैकी एक असून, इथे पोलिसांवर दगड व विटांचे तुकडे फेकण्यात आले होते.

'गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळेच भीतीचे वातावरण'

विरोधक जनतेला भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गृहमंत्री अमित शहाच देशामध्ये भीती आणि अनिश्चितता निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच, नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्यानंतर देशात एनआरसी अंमलात आणण्यात येईल, असे शहा यांनी संसदेत सांगितल्यानंतरच देशात हिंसाचार भडकल्याचा आरोपही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज