अभिनंदन यांनी केले मिग उड्डाणाचे नेतृत्व
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळांवरील हवाई हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या भारतीय हवाई दलाच्या दोन स्क्वाड्रन तसेच एका सिग्नल युनिट यांचा मंगळवारी, ८७व्या भारतीय हवाई दल दिनी विशेष सन्मान करण्यात आला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आ. के. एस. भदौरिया यांच्या हस्ते ५१वी स्क्वाड्रन, ९वी स्क्वाड्रन आणि ६०१ सिग्नल युनिट यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणारे हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी मंगळवारी हवाई दल दिनाच्या सोहळ्यात मिग-२१ विमानांच्या बायसन फॉर्मेशनचे नेतृत्व केले.
बालाकोटच्या हल्ल्यात सहभागी झालेल्या अन्य लढाऊ वैमानिकांनीही मंगळवारच्या उड्डाणात सहभाग घेतला. तीन मिराज-२००० आणि दोन सुखोई-३०एमकेआय विमानांच्या तुकडीच्या अॅव्हेंजर फॉर्मेशनमध्ये शौर्यपदक विजेत्या पाच वैमानिकांनी उड्डाण केले. बायसन फॉर्मेशनचे नेतृत्व विंग कमांडर वर्तमान करत असल्याची घोषणा होताच, सर्वाधिक टाळ्यांचा कडकटाड झाला.
भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट येथे हवाई हल्ले करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी दोन्ही देशांच्या हवाई दलांमध्ये उडालेल्या चकमकीदरम्यान अभिनंदन वर्तमान यांनी पाकिस्तानचे एक विमान पाडले होते. त्यानंतर त्यांचे मिग-२१ बायसन विमानही क्षेपणास्त्रामुळे कोसळले. त्यानंतर पाकव्याप्त काश्मिरात त्यांना पकडण्यात आले. तब्बल ६० तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.
दहशतवादविरोधातील दृष्टिकोन बदलला
गाझियाबाद : 'बालाकोटवरील हवाई हल्ल्याला खूप सामरिक महत्त्व आहे. यातून, दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती आणि पाकिस्तानच्या सीमेत घुसून हल्ला करण्याची हवाई दलाची क्षमता यातून दिसून आली आहे. दहशतवादी हल्ल्यांविरोधात कारवाई करण्याचा सरकारची बदललेली पद्धती यातून दिसून आली आहे,' असे हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल राकेशकुमार सिंह भदौरिया यांनी मंगळवारी स्पष्ट केले. भदौरिया यांनी एक आठवड्यापूर्वीच हवाई दल प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
हिंडन हवाई तळावर हवाई दिनाचा मुख्य कार्यक्रम झाला. या ठिकाणी हवाई दलाच्या तुकड्यांनी शानदार हवाई संचलन केले. या ठिकाणी झालेल्या भाषणामध्येही भदौरिया यांनी राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने अधोरेखित केली. यामध्येही प्रामुख्याने बालाकोटवरील हवाई हल्ल्याचा उल्लेख करताना, या हल्ल्यामध्ये विविध प्रकारे योगदान दिलेल्या सर्व विभाग आणि तुकड्यांचा त्यांनी उल्लेख केला. तिन्ही दलांबरोबर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांकडून कौतुक
युद्धाच्या काळात देशाचे संरक्षण करतानाच, नैसर्गिक आपत्ती असताना जनतेला मदत करताना हवाई दलाने मोलाची कामगिरी केली आहे, या शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हवाई दलाचे कौतुक केले. ८७व्या हवाई दलाच्या निमित्ताने मोदी यांनी ट्विटरवर हवाई दलातील शूरांच्या योगदानाचा व्हिडीओही टाकला.