अ‍ॅपशहर

नव्या संसदेचं आज उद्घाटन, नरेंद्र मोदी करणार राष्ट्राला समर्पित, संपूर्ण सोहळा कसा असेल? जाणून घ्या

Parliament Building: भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज, रविवारी (२७ मे) वेदमंत्रांच्या घोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, ही वास्तू मोदी राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

Edited byप्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2023, 6:59 am

हायलाइट्स:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार राष्ट्राला समर्पित
  • सोहळ्यावर काँग्रेससह २० विरोधी पक्षांच्या बहिष्काराचे सावट
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज, रविवारी (२७ मे) वेदमंत्रांच्या घोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, ही वास्तू मोदी राष्ट्राला समर्पित करणार आहेत. काँग्रेससह २० विरोधी पक्षांच्या बहिष्काराचे सावट या सोहळ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी त्यांच्या धक्कातंत्राचा अविष्कार रविवारीही घडवतील, असेही बोलले जात आहे.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन वैदिक विधींनुसार होणार आहे. मोदी यांनी नवीन संसद संकुलाचा व्हिडीओही शेअर केला आणि ‘माय संसद माय प्राइड’ हॅशटॅग वापरून लोकांनी आपल्या ‘व्हॉइसओव्हर’सह हा व्हिडीओ शेअर करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी आणि सरकारचा पाठिंबा असलेल्या काही खासगी वाहिन्यांवरून करण्यात येईल. याच वेळी तमिळनाडूतून आणलेला विशेष राजदंड (सेंगोल) लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ स्थापित करण्यात येईल.
Breaking वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्षावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावले
या सोहळ्यासाठी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानीच्या सीमा रात्रीपासून सील केल्या आहेत. प्रेस क्लब आणि संसदेच्या जवळपासच्या अन्य संस्थांचे कामकाज रविवारी दुपारपर्यंत बंद राहणार आहे. विरोधी पक्षांपैकी काहींचे कार्यकर्ते विरोध प्रदर्शन करण्याची शक्यता गृहीत धरून पूर्ण ल्युटियन्स दिल्ली परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, या सोहळ्यासाठी पत्रकारांच्या प्रवेशाबद्दलचा घोळ शनिवारपर्यंत सुरू होता.

नवीन संसद भवन हे वास्तुकलेचा एक भव्य नमुना असून, त्याचा आतील भाग देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतो. ही इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याद्वारे संसद सदस्यांना अखंड ‘कनेक्टिव्हिटी’ प्रदान करण्यात येईल. नवीन संसद भवनात लोकसभेच्या आतील भागाची रचना राष्ट्रीय पक्षी मोरापासून, तर राज्यसभेची रचना राष्ट्रीय फूल कमळापासून प्रेरित आहेत. समिती कक्षात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. संसद सदस्यांव्यतिरिक्त संशोधकांनाही नवीन संसद भवनाच्या ग्रंथालयाचा वापर करता येणार आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून, त्याला प्लॅटिनम दर्जा देण्यात आला आहे.

असा असेल कार्यक्रम

- सकाळी ७.१५ - संसदेच्या प्रांगणात पंतप्रधानांचे आागमन

- सकाळी ७.३० - महात्मा गांधी पुतळ्याजवळच्या मंडपात पूजेला सुरुवात

- सकाळी ९ - लोकसभा सभागृहात कार्यक्रम

- सकाळी ९.३० - संसदेच्या लॉबीमध्ये प्रार्थना सभा

- दुपारी १२.०० - पंतप्रधान मोदी पुन्हा संसदेत येतील

- दुपारी १२.०७ - राष्ट्रगीत

- दुपारी १२.१० - राज्यसभेच्या उपसभापतींकडून मान्यवरांचे स्वागत

- दुपारी १२.१७ - संसदेवरील दोन चित्रपटांचे प्रदर्शन

- दुपारी १२.२९ - उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींचा संदेश वाचून दाखविला जाईल

- दुपारी १२.४३ - लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचे भाषण

- दुपारी १.०० - पंतप्रधान ७५ रुपयांचे विशेष नाणे जारी करतील

- दुपारी १.१० - पंतप्रधान मोदींचे भाषण

- दुपारी १.३० - लोकसभा महासचिवांकडून आभार प्रदर्शन
लेखकाबद्दल
प्रशांत पाटील
प्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन'मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख