अ‍ॅपशहर

दोन दहशतवाद्यांना पूंछमध्ये कंठस्नान; मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

परिसराला घेराव घालण्यात आला असून, व्यापक शोधमोहीम अजूनही सुरू आहे,' असेही प्रवक्त्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल आणि एक शक्तिशाली आयईडी यांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 9 Jan 2023, 1:48 pm
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावून लष्कराच्या जवानांनी दोन सशस्त्र दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी रविवारी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम puchh
दोन दहशतवाद्यांना पूंछमध्ये कंठस्नान; घुसखोरीचा प्रयत्न उधळला


‘बालाकोट भागातील सीमेवर कुंपणाजवळ तैनात भारतीय लष्कराच्या जवानांना शनिवारी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास संशयास्पद हालचाली आढळल्या आणि त्यांनी दोन

दहशतवाद्यांना ठार केले. परिसराला घेराव घालण्यात आला असून, व्यापक शोधमोहीम अजूनही सुरू आहे,' असेही प्रवक्त्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांकडून दोन एके रायफल आणि एक शक्तिशाली आयईडी यांसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांच्या संघटनेबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

राजौरी हल्ल्यातील मृतांचा आकडा सातवर

राजौरी/जम्मू :
जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील धंगरी गावात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका नागरिकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रिन्स शर्मा असे त्याचे नाव आहे. यामुळे या हल्ल्यातील एकूण बळींची संख्या सातवर गेली आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.

एक जानेवारीला धंगरी गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्यांना जम्मूच्या सरकारी वैद्यकीय कॉलेज रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले होते. यामध्ये प्रिन्स शर्मा याचाही समावेश होता. येथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गावात झालेल्या हल्ल्यात प्रिन्सचा मोठा भाऊ दीपककुमार याच्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यामागे असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्याची मागणी सरपंच धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केली.

सीमेवर भुयार शोधण्यासाठी रडारयुक्त ड्रोन

नवी दिल्ली/जम्मू :
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जम्मू क्षेत्रात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवाद्यांकडून घुसखोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या भुयारांच्या शोधासाठी प्रथमच रडार असलेले ड्रोन तैनात केले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारताच्या क्षेत्रात दहशतवादी घुसखोरी करू नयेत आणि जम्मू-काश्मीर किंवा देशाच्या कोणत्याही अन्य भागात हल्ले करू नयेत, यासाठी संरक्षण दलाने भुयार शोधण्याच्या अभ्यासाचा भाग म्हणून स्वदेशी बनावटीच्या या तांत्रिक उपकरणाचा वापर केला आहे. ही भुयारे अमली पदार्थ, शस्त्रे आणि दारूगोळा याच्या तस्करीसाठीही वापरण्यात येतात. गेल्या तीन वर्षांत बीएसएफने जम्मू येथे सुमारे १९२ किमीच्या किमान पाच भुयारांचा शोध लावला आहे. जम्मू क्षेत्रात एकाहून जास्त रडारयुक्त ड्रोन तैनात करण्यात आले आहेत, असे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महत्वाचे लेख