वृत्तसंस्था, नवी दिल्ली
काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी चौकशी केली. परदेशात अवैधरित्या मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, प्रथमच ते चौकशीच्या कक्षेत आले आहेत.
गेल्या आठवड्यात दिल्ली न्यायालयाने वड्रा यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना बुधवारी चौकशीस सामोरे जाण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार वड्रा दुपारी पावणेचारच्या सुमारास मध्य दिल्लीतील जामनगर हाऊस ईडी कार्यालयात हजर झाले. 'राजकीय हेतूनेच आपल्याला या प्रकरणात लक्ष्य केले जात आहे', असा सातत्याने आरोप करणाऱ्या वड्रा यांना प्रियांका गांधी यांनी 'ईडी' कार्यालयापर्यंत सोबत केली. त्यानंतर वड्रा आपल्या वकिलांसोबत चौकशीला सामोरे गेले.
लंडनच्या १२, ब्रायनस्टोन स्क्वेअर येथील १९ लाख पौंड मूल्याची मालमत्ता वड्रा यांचीच असल्याचा तसेच लंडनमधील इतरही मालमत्ता त्यांनी खरेदी केल्याचा 'ईडी'चा आरोप आहे. या खरेदी व्यवहारात मनी लाँडरिंगबाबतच्या कायद्यांचा भंग झाल्याचाही 'ईडी'ने त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. या चौकशीत वड्रा यांना लंडनमधील काही मालमत्तांचे व्यवहार, खरेदी व ताबा याबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते. दरम्यान, वड्रा यांना १२ फेब्रुवारी रोजी पुन्हा ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहावे, असा आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे.
वड्रा माझे पती आहेत, माझे कुटुंब आहे. मी माझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. - प्रियांका गांधी