अ‍ॅपशहर

तलावातून न्यावी लागली अंत्ययात्रा!

एका समाजकंटकाने स्मशानभूमीकडे जाण्यासाठी वाट न दिल्याने लोकांना नाईलाजास्तव तुडूंब भरलेल्या तलावातून अंत्ययात्रा काढावी लागल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील पनागरमध्ये घडली आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे.

Maharashtra Times 27 Aug 2016, 2:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जबलपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम villagers carry body through pond in jabalpur
तलावातून न्यावी लागली अंत्ययात्रा!


एका समाजकंटकाने स्मशानभूमीकडे जाण्यासाठी वाट न दिल्याने लोकांना नाईलाजास्तव तुडूंब भरलेल्या तलावातून अंत्ययात्रा काढावी लागल्याची संतापजनक घटना मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील पनागरमध्ये घडली आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे.

ब्रह्मनौदा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या बिहर गावात स्मशानाकडे जाणारी वाट तलावाच्या काठावरून जाते. मात्र अलीकडेच तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने ही वाट पाण्याखाली गेली आहे. तिथे सध्या चार फूट खोल पाणी आहे. त्यामुळे स्मशानाकडे जाण्यासाठी नलिन शर्मा याच्या मालकीच्या जमिनीतून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशावेळी शर्माने लोकांची अडवणूक केल्याने पाण्यातूनच अंत्ययात्रा न्यावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय कांतिबाई पटेल यांचे गुरुवारी निधन झाले. त्यानंतर ११ वाजता नातेवाईक व गावकऱ्यांनी अंत्ययात्रा सुरू केली. तलावाजवळची वाट पाण्याखाली गेल्याने लोकांनी नलिन शर्मा यांच्या वाटेतून जाण्याचे ठरवले. मात्र, अंत्ययात्रा तिथे येताच शर्माने त्यांना रोखले व आपल्या जमिनीतून जाण्यास मनाई केली. त्यानंतर नाईलाजास्तव लोक माघारी फिरले व ४ फूट पाण्यात उतरून तलाव पार करत त्यांनी स्मशानभूमी गाठली. मात्र तिथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करून भातपिकाची लागवड करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा प्रश्न सर्वांना पडला. दरम्यान, गावच्या सरपंच सपना बैरागी तिथे तातडीने दाखल झाल्या. त्यानंतर सुमारे तासाभराने कांतिबाई यांच्या पार्थिवावर खासगी जमिनीवरच अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज