अ‍ॅपशहर

‘काश्मीरशी भावनिक नाते हवे’

केंद्र सरकार व काश्मीरमध्ये केवळ गरजेपुरते संबंध आम्हाला अपेक्षित नसून उभयपक्षी भावनिक नाते निर्माण व्हावे, असे केंद्राला वाटते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केले.

Maharashtra Times 25 Jul 2016, 3:38 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम want emotional relationship with people of kashmir rajnath singh
‘काश्मीरशी भावनिक नाते हवे’


केंद्र सरकार व काश्मीरमध्ये केवळ गरजेपुरते संबंध आम्हाला अपेक्षित नसून उभयपक्षी भावनिक नाते निर्माण व्हावे, असे केंद्राला वाटते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथे केले. काश्मीरमध्ये गेले काही दिवस उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या राज्याचा दोन दिवसीय दौरा केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काश्मीरप्रश्नी पाकिस्तानने ढवळाढवळ करू नका, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला.

राजनाथ यांनी या दौऱ्यात काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेत्यांशी तसेच शिष्टमंडळाशी चर्चा केली. केंद्र सरकारच्या भूमिकेचा विचार करायचा झाला तर आम्हाला काश्मीरशी केवळ गरजेपुरते संबंध अभिप्रेत नसून आमच्यात भावनिक नाते असावे, असे वाटते. काश्मीरमधील तरुणांनी दगडफेकीसारख्या पर्यायांचा आसरा घेऊ नये.

काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर कसे येईल, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, त्यासाठी तुमच्याकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांवर आम्ही विचार करू, असे ते म्हणाले. हल्लेखोर तरुणांना नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराने छऱ्याच्या बंदुकींचा वापर टाळावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी पाकिस्तानचाही समाचार घेतला. काश्मीरबाबत पाकिस्तानची भूमिका पाक (पवित्र) नाही. येथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी आम्हाला अन्य कोणाच्या मदतीची गरज नाही. पाकिस्तान स्वत: दहशतवादात भरडला जात आहे. दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी जे आपल्या देशातील लाल मशिदीत घुसून कारवाई करतात तेच काश्मीरमधील तरुणांना चिथावणी देतात. हे प्रकार थांबले पाहिजेत, असा इशारा त्यांनी दिला.

लष्कराच्या पाठिशी राहा

देशाने दहशतवाद्यांच्या नव्हे तर देशाच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी हैदराबाद येथे केले. भारत आणि पाकिस्तानदरम्यान पाकव्याप्त काश्मीर हा प्रलंबित प्रश्न आहे. यावरुन वेळोवेळी निर्माण होणाऱ्या वादाच्या वेळी काश्मीरने स्थानिक भूमिका न घेता देशाच्या दृष्टिकोनातून विचार करावा, असे आम्ही त्या राज्य सरकारला सांगितले आहे, असे ते म्हणाले. लष्कराने ठार केलेल्या बुऱ्हान वानी या दहशतवाद्यावर १४ गुन्हे होते, त्याने लष्करावर हल्लेही केले होते, असे त्यांनी नमूद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज