अ‍ॅपशहर

राणे अमित शहांना भेटले, पण...

'राज्याचा दौरा करून नंतरच आपण पुढचा निर्णय घेणार' अशी घोषणा करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपला नियोजित महाराष्ट्र दौरा बाजूला ठेऊन आज थेट दिल्लीत दाखल झाले. राणे दिवसभर भाजप नेत्यांसोबत होते. आधी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरी बैठक झाली आणि नंतर राणे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली.

Maharashtra Times 26 Sep 2017, 12:02 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम week after quitting congress narayan rane meet amit shah in delhi
राणे अमित शहांना भेटले, पण...


'राज्याचा दौरा करून नंतरच आपण पुढचा निर्णय घेणार' अशी घोषणा करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपला नियोजित महाराष्ट्र दौरा बाजूला ठेऊन आज थेट दिल्लीत दाखल झाले. राणे दिवसभर भाजप नेत्यांसोबत होते. आधी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरी बैठक झाली आणि नंतर राणे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली. मात्र, रात्री उशिरा 'राणे यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंधुदुर्गातील हॉस्पिटलच्या उद्घाटनाला येण्याचे आमंत्रण दिले आहे', असे दानवे यांनी सांगितले आणि सगळेच अवाक् झाले.

राणे आज दिल्लीत दाखल झाल्याने त्यांच्या दिल्लीतील हालचालींवर सगळ्यांच्याच नजरा होत्या. राणे आधी दानवे यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. काही वेळानंतर मुख्यमंत्री दुसरी महत्त्वाची बैठक असल्याने तेथून निघाले.

दरम्यान, दानवे, पाटील आणि राणे नंतर एकाच कारमधून अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले. शहा यांच्यासोबत या सर्वांची बंद दाराआड चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणती चर्चा झाली, याबाबत गुप्तता पाळण्यात आली. राणे यांनी माध्यमांना टाळलं तर दानवे यांनी ही बैठक राजकीय नव्हती असे सांगून पत्रकारांचे प्रश्न टोलवले. त्यामुळे राणेंबाबत कोणता निर्णय झाला, या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात राहिले आहे.

कोणतीही राजकीय चर्चा नाही!

राणे यांनी त्यांच्या मतदारसंघात सुसज्ज असं रुग्णालय उभारलं आहे. या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींनी यावं, अशी राणे यांची इच्छा आहे. या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठीच राणे आज दिल्लीत आले होते, असे दानवे यांनी पत्रकारांना सांगितले. राणे यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. एक मित्र म्हणून ते माझ्या घरी आले होते, असा दावाही दानवे यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज