अ‍ॅपशहर

'त्या' जवानांच्या पत्नींनी दिला इशारा

जवानांना निकृष्ट दर्जाचं अन्न मिळतं, असा आरोप करणारा बीएसएफ जवान तेज बहादूर यादव आणि अधिकारी बूट साफ करायला लावतात, असा आरोप करणारा जवान यज्ञ प्रताप सिंह या दोघांच्या पत्नी आपल्या नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून उभ्या ठाकल्या आहेत.

Maharashtra Times 14 Jan 2017, 1:27 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wives of bsf jawan tej bahadur yadav and armyman yagya pratap singh come in support of their husbands
'त्या' जवानांच्या पत्नींनी दिला इशारा


जवानांना निकृष्ट दर्जाचं अन्न मिळतं, असा आरोप करणारा बीएसएफ जवान तेज बहादूर यादव आणि अधिकारी बूट साफ करायला लावतात, असा आरोप करणारा जवान यज्ञ प्रताप सिंह या दोघांच्या पत्नी आपल्या नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून उभ्या ठाकल्या आहेत. यज्ञ प्रताप सिंहच्या पत्नीने तिच्या पतीचा मोबाइल जप्त करण्यात आल्याचा आरोप केला आहे तर तेज प्रतापच्या पत्नीने संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

यज्ञ प्रतापची पत्नी ऋचा हिने सरकार आणि अधिकाऱ्यांवर तोफ डागली आहे. ती म्हणाली, माझ्या पतीशी माझं बोलणं झालं. ते उपोषणाला बसले आहेत. फोनवर बोलताना ते रडत होते. काहीही झालं तरी न्याय मिळाला पाहिजे, असं ते म्हणत होते. त्यांचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. दुसऱ्या कुणाच्यातरी मोबाइलवरून त्यांनी फोन केला होता. पुन्हा कधी बोलणं होईल हे सांगता येत नाही, असं त्यांनी मला सांगितले. जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सगळे पुरावे आहेत. जर मोबाइल मिळाला नाही तर मी काय पुरावा देणार, असा सवाल करताना उपोषणाला बसलेला माझा नवरा आजारी पडला आणि त्यांना काही झालं तर त्यास पूर्णपणे सरकार आणि संबंधित अधिकारीच जबाबदार असतील असा इशाराच ऋचा यांनी दिला.

तेज बहादूर यादव यांची पत्नी शर्मिला यादव यांनीही नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून कंबर कसली. निकृष्ट जेवणाबाबत माझ्या नवऱ्याने जे आरोप केलेत तसेच या आरोपानंतर त्यांच्यावर जी कारवाई करण्यात आली या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शर्मिला यांनी केली. माझा नवरा दडपणाखाली आहे. दोन दिवसांपासून त्यांच्याशी माझं बोलणं होऊ शकलेलं नाही. त्यांना समोर येऊ दिलं जात नाहीय, असा आरोप करताना मीडियाशी बोलण्याची परवानगी त्यांना मिळावी, अशी मागणी शर्मिला यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज