अ‍ॅपशहर

Coronavirus updates युरोपमध्ये करोनाचा कहर सुरूच; फ्रान्समध्ये ६० हजार बाधित

Coronavirus updates: करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या युरोपमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये अंशत: अथवा पूर्णत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Nov 2020, 5:02 pm
पॅरिस: करोनाच्या पहिल्या साथीवर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरलेल्या युरोपीयन देशांना करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउन सुरू असतानाही करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. फ्रान्समध्ये एकाच दिवसात ६० हजार बाधित आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जर्मनीमध्ये करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी एक महिन्यासाठी अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Coronavirus Europe
युरोपमध्ये करोनाचा कहर सुरूच; फ्रान्समध्ये ६० हजार नवे बाधित


फ्रान्समध्ये एकाच दिवसात ६० हजार ४८६ नवीन करोनाबाधित आढळले. फ्रान्समधील एकूण करोनाबाधितांची संख्या १७ लाखांहून अधिक झाली आहे. त्याआधी एकाच दिवसात ५८ हजार बाधितांची नोंद करण्यात आली. ती सर्वोच्च संख्या होती. फ्रान्समध्ये करोनाच्या संसर्गामुळे ३९ हजार ९१६ जणांना प्राण गमवावे लागले आहे.

वाचा: करोनाची दुसरी लाट; ब्रिटन सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अंशत: लॉकडाउन सुरू केले आहे. लोकांना केवळ कामाच्या निमित्ताने घराबाहेर जाण्याची परवानगी आहे. बार, कॅफे, जिम आणि रेस्टॉरंट्स बंद करण्यात आली आहेत. एका महिन्यासाठी लॉकडाऊन लागू करून करोनाबाधितांची संख्या प्रति दिवस पाच हजारांवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

वाचा: बापरे! लॉकडाउनच्या घोषणेनंतर ७०० किमीची वाहतूक कोंडी


जर्मनीत करोनाचा कहर


जर्मनीत सुरू असलेल्या अंशत: लॉकडाउनचा पहिला आठवडा पूर्ण होण्याआधीच एकाच दिवसात सर्वाधिक रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली. शनिवारी, १९ हजार ५९ नवीन बाधित आढळले. जर्मनीत एका दिवसात आढळलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. जर्मनीत सुरू असलेला लॉकडाउन हा मार्च महिन्यापेक्षा कमी निर्बंधाचा आहे. रेस्टोरंट, बार, चित्रपटगृह आदी ठिकाणे बंद असून शाळा, सलून आणि दुकाने सुरू करण्यात आली आहेत. निर्बंधांमध्ये सक्ती नसल्यामुळेच बाधितांची संख्या वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा: करोना: अमेरिकेला याच वर्षी लस पुरवठा करण्यास 'ही' कंपनी तयार

सिंगापूरमध्ये नाइट लाइफ सुरू होणार!


सिंगापूरमध्ये रात्रीच्या वेळी काही मोजक्या आस्थापनांना दोन महिन्यांसाठी सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. करोनाच्या थैमानामुळे पब, बार, हॉटेल जवळपास नऊ महिने बंद होते. आता त्यांना दोन महिने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ग्राहकांना मास्क अनिर्वाय करण्यात आले आहेत. त्याशिवाय अन्नपदार्थ खाण्याच्या व्यतिरिक्त इतर वेळी ग्राहक मास्कचा वापर करत आहेत की नाही, याची खबरदारी संबंधित आस्थापनांना घ्यावी लागणार आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत ५८ हजार ५४ जणांना करोनाची बाधा झाली असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज